औरंगाबादचा मजूर व्हिजलन्सच्या रडारवर; खात्यातून वर्षभरात १ कोटीहून अधिकचे व्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 23:06 IST2021-09-10T23:06:18+5:302021-09-10T23:06:30+5:30
मजुरी करणाऱ्या तरुणाच्या खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार; तरुण पूर्णत: अनभिज्ञ

औरंगाबादचा मजूर व्हिजलन्सच्या रडारवर; खात्यातून वर्षभरात १ कोटीहून अधिकचे व्यवहार
औरंगाबाद: बिहारच्या औरंगाबादमधील एका गरीब तरुणाच्या खात्यातून एक कोटीहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याची बाब समोर आली आहे. प्रकरण पंजाब नॅशनल बँकेशी संबंधित आहे. खातेधारक सोनू कुमार रिसियप गावचा रहिवासी असून सध्या तो नागपुरात मजुरीचं काम करतो. गेल्या वर्षभरात त्याच्या खात्यातून मोठ्या रकमेचे व्यवहार झाले आहेत.
दिल्लीतल्या दक्षता पथकानं बँकेला तरुणाच्या खात्यातून होत असलेल्या मोठ्या व्यवहारांची सूचना दिल्यानंतर प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर बँक व्यवस्थापकांनी याची माहिती सोनू कुमारला दिली. आपल्याला या व्यवहाराची कोणतीही कल्पना नसल्याचं सोनूनं सांगितलं. यानंतर सोनूनं बँक व्यवस्थापकांना एक अर्ज दिला. आपल्या खात्यात अज्ञात व्यक्तींनी मोठ्या रकमा जमा केल्या आणि मोठ्या रकमा काढल्याचं सोनूनं अर्जाच्या माध्यमातून व्यवस्थापकांना सांगितलं.
मोठ्या रकमेचे व्यवहार ऑनलाईन
सोनूनं त्याचं खातं तातडीनं बंद करण्याची आणि २३ जून २०२० पासूनच्या व्यवहाराची स्टेटमेंट्स देण्याची मागणी केली आहे. सोनूच्या खात्यातून झालेले मोठे व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. बँकेतून जमा-खर्चाच्या अर्जाच्या माध्यमातून व्यवहार झालेले नाहीत.
सोनू कुमारचं खातं झीरो बॅलन्स
विशेष म्हणजे ज्या खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार झाले, ते खातं झीरो बॅलन्सवर उघडण्यात आलं. सोनूनं आठवीत असताना बँक खातं उघडलं होतं. बँकेत त्यानं जे पैसे भरले, ते त्यानं काढले. त्यानं केलेला शेवटचा व्यवहार ५०० रुपयांचा आहे. सोनूनं ५०० रुपये बँकेत जमा केले. त्याचं व्याज धरुन ७०० रुपये झाले. लॉकडाऊनच्या काळात त्यानं पासबुक प्रिंट करण्यासाठी, खातं मोबाईल नंबरला लिंक करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.