तिकडे तेलवाहिनी फुटली; इकडे रेल्वेवाहतूक थांबली, उरण-नेरुळ ट्रेनला फटका, द्रोणागिरी यार्डमधील वाहतूक बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:34 IST2025-11-13T12:33:01+5:302025-11-13T12:34:45+5:30
Uran-Nerul Railway: उरण - उरण-धुतुम येथील खासगी इंडियन ऑइल अदानी वेंचर्स लिमिटेड कंपनीची अत्यंत ज्वलनशील नाफ्ता, पेट्रोलजन्य पदार्थ वाहून नेणारी पाइपलाइन बुधवारी (ता. १२) सकाळी फुटली.

तिकडे तेलवाहिनी फुटली; इकडे रेल्वेवाहतूक थांबली, उरण-नेरुळ ट्रेनला फटका, द्रोणागिरी यार्डमधील वाहतूक बंद
- मधुकर ठाकूर
उरण - उरण-धुतुम येथील खासगी इंडियन ऑइल अदानी वेंचर्स लिमिटेड कंपनीची अत्यंत ज्वलनशील नाफ्ता, पेट्रोलजन्य पदार्थ वाहून नेणारी पाइपलाइन बुधवारी (ता. १२) सकाळी फुटली. हे ज्वलनशील द्रव्य न्हावा-शेवा स्थानकाजवळील रेल्वे रुळालगतचा तलाव, डबक्यात जमा झाल्याने प्रवासी वाहतुकीलाही धोका निर्माण झाला आहे. यामुळे खबरदारी म्हणून सकाळपासूनच उरण-खारकोपर मार्गावरील रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. तर द्रोणागिरी-धुतुमदरम्यानची कंटेनर वाहतूक बंद करून अन्य मार्गाने वळविण्यात आली.
तेलगळतीच्या उग्र दर्पाने नागरिकांना मळमळणे, डोळे चुरचुरणे, गुदमरणे अशी लक्षणे जाणवू लागली. यामुळे सकाळी ११:४० पासून उरण-नेरूळ मार्गावरील रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील यांनी दिली. घटनेनंतर तातडीने द्रोणागिरी कंटेनर यार्ड परिसरातील कंटेनर वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रण उरण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी दिली.
पाच तासांनंतर पूर्ववत
इंडियन ऑइल अदानी वेंचर्स लिमिटेड कंपनीच्या तेल वाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामात काही त्रुटी राहून गेल्याने तेल गळतीसारखी गंभीर परिस्थिती यापूर्वीही जुलै २०२४ मध्ये निर्माण झाली होती.
एप्रिल २०२५ मध्ये अदानी वेंचर्स लिमिटेड कंपनीच्या नवघर टर्मिनलमधील टॅक नं-२२ मध्ये आग लागून स्फोट झाला होता. यामध्ये रोहित सरगर हा अभियंता गंभीररीत्या जखमी झाला होता.
मंगळवारी सकाळी ११:४० पासून बंद पडलेली रेल्वे प्रवासी वाहतूक संध्याकाळी पाचनंतर पूर्ववत झाली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
तेल वाहिन्यांची दुरुस्ती आणि पसरलेले पेट्रोलजन्य पदार्थ सक्शन पंप लावून जमा करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती इंडियन ऑइल अदानी वेंचर्स लिमिटेड कंपनीचे एचआर संदीप काळे यांनी दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तेलवाहिनी फुटल्यानंतर तातडीने दोन्ही बाजूंनी ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारे व्हॉल्व बंद केले. तसेच, कंपनीने जमा झालेल्या नाफ्था, पेट्रोलजन्य पदार्थावर फोमचा मारा केल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
डॉ. उद्धव कदम, तहसीलदार, उरण