Odisha Train Accident : Video - अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेसमोर जोडले हात; 51 तासांत ट्रॅक पुन्हा सुरू, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 12:22 IST2023-06-05T11:32:12+5:302023-06-05T12:22:21+5:30
Odisha Train Accident : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. पहिली ट्रेन रुळावरून गेल्यावर वैष्णव यांनी हात जोडले.

Odisha Train Accident : Video - अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेसमोर जोडले हात; 51 तासांत ट्रॅक पुन्हा सुरू, म्हणाले...
बालासोर येथे रेल्वेच्या झालेल्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. तीन रेल्वेगाड्यांना झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या २८८ वर पोहोचली असून ११७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यातील ५६ लोक गंभीर जखमी असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान बालासोरमध्ये ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी रविवारी रात्री उशिरा रुळ दुरुस्त करून ही लाईन पुन्हा कार्यान्वित करण्यात आली. तर यापूर्वी ही मेन लाइन सुरू होण्यासाठी बुधवारपर्यंत वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले होते.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. पहिली ट्रेन रुळावरून गेल्यावर वैष्णव यांनी हात जोडले. रेल्वेमंत्री वैष्णव रेल्वे अपघातानंतर अवघ्या 12 तासांनी बालासोरमध्ये घटनास्थळी पोहोचले होते. तेव्हापासून ते ओडिशात लोकांच्या सेवेत व्यस्त आहे. येथे त्यांनी रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीपासून ते रूग्णालयापर्यंतच्या जखमींची भेट घेतली असून घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.
Down-line restoration complete. First train movement in section. pic.twitter.com/cXy3jUOJQ2
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 4, 2023
रविवारी रात्री उशिरा ट्रॅक सुरू झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना वैष्णव म्हणाले की, आमची जबाबदारी अजून संपलेली नाही. हरवलेल्या लोकांना त्यांच्या कुटुंबियांना शक्य तितक्या लवकर शोधण्यात मदत करणे हे आमचे ध्येय आहे. ट्रॅक सुरू झाल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी येथून जाणाऱ्या मालगाडीला झेंडा दाखवला आणि सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थनाही केली. पंतप्रधान मोदींच्या आदेशानंतरच ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला होता. दुरुस्ती पथकाने परिश्रमपूर्वक आणि हुशारीने काम केले आणि घटनेनंतर 51 तासांच्या आत अप आणि डाऊन दोन्ही मार्ग पूर्ववत केले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
रेल्वेने ओडिशा ट्रेन अपघातात मोटरमनची चूक आणि सिस्टममध्ये बिघाड होण्याची शक्यता नाकारली आणि 'इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग' सिस्टममध्ये संभाव्य 'तोडफोड' आणि छेडछाड करण्याचे संकेत दिले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, अपघाताचे "मूळ कारण" शोधून काढले आहे आणि त्यासाठी जबाबदार "दोषी" शोधले आहेत. 'हा अपघात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमुळे आणि पॉइंट मशीनमध्ये केलेल्या बदलांमुळे घडला,"
बालासोर जिल्ह्यातील अपघातस्थळी त्यांनी सांगितले की, छेडछाड होण्याची शक्यता दर्शवत, सिग्नल दिला आणि ट्रेन थांबली" ट्रेन नंबर १२८४१ कोरोमंडल एक्स्प्रेस अप मेन लाईनसाठी रवाना करण्यात आली, पण ट्रेन अप लूप लाईनमध्ये घुसली आणि लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली आणि रुळावरून घसरली. दरम्यान, ट्रेन क्रमांक १२८६४ बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस डाउन मेन लाइनवरून जात असताना तिचे दोन डबे रुळावरून घसरले आणि उलटले.