Odisha Train Accident: 'मी पाहिलं कोणाला पाय, हात नाहीत, माझ्या सीटखाली एक दोन वर्षांचा मुलगा...', प्रत्यक्षदर्शीने अपघाताचा सांगितला घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 10:46 IST2023-06-03T10:17:45+5:302023-06-03T10:46:05+5:30
अपघातानंतर तेथील परिस्थिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली.

Odisha Train Accident: 'मी पाहिलं कोणाला पाय, हात नाहीत, माझ्या सीटखाली एक दोन वर्षांचा मुलगा...', प्रत्यक्षदर्शीने अपघाताचा सांगितला घटनाक्रम
ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी २ जून रोजी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत २८० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक राजकीय व्यक्तींनी या दुर्घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर गोवा-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे कामकाज रद्द करण्यात आल्याचे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
काल झालेल्या भीषण अपघाताची माहिती एका प्रत्यदर्शीने दिली. प्रवाशाने सांगितले की, 'मी कोरोमंडल एक्सप्रेसने प्रवास करत होतो. आम्ही S5 बोगीत होतो. अपघात झाला तेव्हा मी झोपेत होतो. मला जेव्हा अचानक जाग आली, तेव्हा समोरच दृष्य पाहून धक्काच बसला.यावेळी कुणाला हात किंवा पाय नव्हते असे आम्ही पाहिले. आमच्या सीटखाली एक दोन वर्षांचा मुलगा होता जो पूर्णपणे सुरक्षित होता. नंतर आम्ही त्याच्या कुटुंबीयांची सुटका केली. TMC खासदार डोला सेन म्हणाल्या, 'माझ्या आयुष्यात इतका दुर्दैवी अपघात मी कधीच पाहिला नाही. दोन्ही पॅसेंजर गाड्या भरल्या होत्या. दोन्ही गाड्यांमध्ये मिळून ३०००-४००० लोक असण्याची शक्यता आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बालासोर जिल्ह्यातील बहनगा येथे झालेल्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. ३ जून रोजी संपूर्ण राज्यात कोणताही उत्सव साजरा केला जाणार नाही.
बालासोर येथील रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर गंभीर जखमींना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.