वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 16:34 IST2025-07-07T16:34:18+5:302025-07-07T16:34:42+5:30
Vande Bharat Stuck in Flood Odisha: टाटा नगरहून बरहमपूरला जाणारी वंदे भारत ट्रेन गुहालिडीही स्टेशनवरच थांबविण्यात आली होती. रेल्वे ट्रॅकवर गुडघाभर पाणी होते.

वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
हायटेक वंदे भारत एक्स्प्रेसने रेल्वेचा प्रवास सुखकर केला आहे. याचबरोबर ही ट्रेनही काही ना काही कारणांनी सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच गळक्या वंदे भारत ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता वंदे भारत ट्रेन पावसाच्या पाण्यात अडकल्याचे समोर आले आहे.
टाटा नगरहून बरहमपूरला जाणारी वंदे भारत ट्रेन गुहालिडीही स्टेशनवरच थांबविण्यात आली होती. रेल्वे ट्रॅकवर गुडघाभर पाणी होते. पुढचे ट्रॅकदेखील पाण्याखाली गेले होते. जवळपास सात तास ही ट्रेन स्टेशनवरच थांबवून ठेवण्यात आली होती. ओडिशामध्ये मुसळधार पाऊस असल्याने हा सगळीकडेच पूर आला होता. यामुळे तेथील लोकांना त्रास सहन करावा लागला. परंतू, ट्रेनमधील प्रवाशांनाही मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले.
रविवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही ट्रेन गुहालिडीही स्टेशनवर आली होती. तिथून पुढे नेण्याचे धाडस काही केल्या ट्रेनच्या ऑपरेटरला झाले नाही. वंदे भारतच्या नाकापर्यंत पाणी लागलेले होते. सात तास प्रवासी एकाच जागेवर बसून होते. कोणत्याही प्रवाशाला कोणतीही गंभीर आरोग्य समस्या किंवा दुखापत झाली नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अखेर ही ट्रेन पुढे नेण्यासाठी रेल्वेने एक इंजिन पाठवून दिले होते. त्या इंजिनाने वंदे भारतला ओढून पुढे केंदुझरगढ़ स्टेशनवर नेण्यात आले. यानंतर वंदे भारतने पुढचा प्रवास सुरु केला. एनडीटीव्हीने याचे वृत्त दिले आहे.