हत्तींचा कळप पुन्हा रुळावर आला; आसाम रेल्वे अपघातानंतर वनविभाग हाय अलर्टवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 11:40 IST2025-12-22T11:39:02+5:302025-12-22T11:40:06+5:30
Odisha Elephant Accident : काही दिवसांपूर्वीच राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत 8 हत्तींचा मृत्यू झाला होता.

हत्तींचा कळप पुन्हा रुळावर आला; आसाम रेल्वे अपघातानंतर वनविभाग हाय अलर्टवर
Odisha Elephant Accident : ओडिशातील बलांगीर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून हत्तींच्या हालचालींमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, रविवारी संध्याकाळी एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली. सुमारे 30 हत्तींचा कळप तुरेकला रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅक ओलांडताना आढळून आला. या घटनेमुळे रेल्वे आणि वन विभागाची चिंता अधिकच वाढली आहे.
संध्याकाळीच बाहेर पडतात हत्ती
मिळालेल्या माहितीनुसार, हा हत्तींचा कळप आसपासच्या जंगलांदरम्यान सतत हालचाल करत आहे. विशेष म्हणजे हे हत्ती बहुतेक वेळा संध्याकाळी किंवा रात्रीच जंगलाबाहेर पडतात, तर दिवसा जंगलाच्या आतच राहतात. त्यामुळे त्यांच्यावर सतत नजर ठेवणे अधिकाऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. तुरेकला ब्लॉक परिसरात गेल्या काही दिवसांपासून हत्तींची हालचाल सातत्याने दिसून येत आहे.
रेल्वे आणि वन विभाग हाय अलर्टवर
हा परिसर कांटाबांजी रेल्वे मार्गाअंतर्गत येतो, जो एक अत्यंत वर्दळीचा रेल्वे मार्ग मानला जातो. या मार्गावरून अनेक एक्सप्रेस गाड्या धावतात. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी हत्तींचा रेल्वे ट्रॅकवर वावर होणे मोठ्या अपघाताला आमंत्रण देऊ शकते.
या संभाव्य धोक्याची दखल घेत रेल्वे आणि वन विभागाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. वन विभागाच्या टीम्स हत्तींच्या हालचालींवर सतत नजर ठेवून आहेत. गरज भासल्यास गाड्यांचा वेग कमी करणे, लोको पायलट्सना सतर्क करणे अशा उपाययोजना करण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे.
#WATCH | Assam | Seven elephants were killed after the Train no. 20507 DN Sairang - New Delhi Rajdhani Express dashed into elephants in the Jamunamukh - Kampur section under Lumding Division of N.F. Railway: Forest Official of Nagaon Division
— ANI (@ANI) December 20, 2025
(Visuals from the spot) https://t.co/4Oqx0F5bqopic.twitter.com/rQt0jABhFl
आसाममधील अपघातामुळे चिंता अधिक वाढली
या प्रकरणातील चिंता यासाठीही गंभीर ठरत आहे, कारण अलीकडेच आसाममध्ये राजधानी एक्सप्रेसच्या धडकेत 8 हत्तींचा मृत्यू झाला होता. त्या अपघातात ट्रेनचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नव्हती, मात्र वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर बलांगीरमध्ये एवढ्या मोठ्या हत्तींच्या कळपाने रेल्वे ट्रॅक ओलांडणे प्रशासनासाठी गंभीर इशारा मानला जात आहे.
सतत नजर, अपघात टाळण्याचे प्रयत्न
सध्या परिस्थितीवर कडक नजर ठेवण्यात येत असून, हत्ती आणि रेल्वे गाड्यांमध्ये कोणत्याही प्रकारची धडक होऊ नये यासाठी वन व रेल्वे विभाग संयुक्तपणे उपाययोजना करत आहेत. ही संवेदनशील परिस्थिती सुरक्षितपणे हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.