CoronaVirus News: १० महिन्यांनंतर शाळा सुरू होताच कोरोनाचा उद्रेक; अवघ्या ३ दिवसांत ३१ जणांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 16:46 IST2021-01-12T16:45:37+5:302021-01-12T16:46:47+5:30
CoronaVirus News: विद्यार्थी , शिक्षकांना कोरोनाची लागण होताच शाळा बंद करण्याचा निर्णय

CoronaVirus News: १० महिन्यांनंतर शाळा सुरू होताच कोरोनाचा उद्रेक; अवघ्या ३ दिवसांत ३१ जणांना लागण
भुवनेश्वर: ओदिशाच्या गजपती जिल्ह्यात शाळा उघडताच पहिल्या ३ दिवसांत ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप कुमार पात्रा यांनी याबद्दलची माहिती दिली. जिल्ह्यातल्या शाळांमध्ये ३१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये ९० टक्के जण शिक्षिक आहेत. या शाळा आता बंद करण्यात आल्या आहेत, असं पात्रा यांनी सांगितलं.
'शाळा सुरू करण्याआधी सर्व नियमांचं पालन करण्यात आलं. शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मात्र तरीही ३१ जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोरोनाची बाधा झालेले २१ विद्यार्थी मोहना ब्लॉकचे आहेत,' असं पात्रा म्हणाले. बोर्ड परीक्षांमुळे राज्य सरकारनं ८ जानेवारीला दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. शनिवार आणि रविवार वगळता १०० दिवस शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला.
विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांची परवानगी घेण्यात आली होती. मात्र अनेक पालकांच्या मनात कोरोनाबद्दल धास्ती आहे. त्यामुळे शाळांमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांची फारशी उपस्थिती नाही. त्यातच आता जिल्ह्यात अवघ्या तीन दिवसांत ३१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं सर्वच जण धास्तावले आहेत.