परपुरुषाशी अश्लील चॅटिंग हा पतीचा छळ : कोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 11:18 IST2025-03-18T11:18:31+5:302025-03-18T11:18:51+5:30
लग्नानंतर पती-पत्नी दोघांनाही मोबाइल वापरण्याचे, चॅटिंगचे आणि मित्रांशी बोलण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु संभाषणाची पातळी सभ्य असावी, असे इंदूर न्यायालयाने म्हटले आहे.

परपुरुषाशी अश्लील चॅटिंग हा पतीचा छळ : कोर्ट
इंदूर : लग्नानंतर पत्नी किंवा पती आपल्या मित्रांसोबत असभ्य किंवा अश्लील संभाषण करू शकत नाहीत. कोणताही पती किंवा पत्नी मोबाइलवर परपुरुष किंवा महिलेशी अश्लील चॅटिंग सहन करणार नाही, असे इंदूर उच्च न्यायालयाने निर्णय देताना म्हटले आहे.
लग्नानंतर पती-पत्नी दोघांनाही मोबाइल वापरण्याचे, चॅटिंगचे आणि मित्रांशी बोलण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु संभाषणाची पातळी सभ्य असावी, असे इंदूर न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती विवेक रुसिया आणि गजेंद्र सिंह यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पत्नीचे अपील फेटाळल्यानंतर हा आदेश दिला. यात पतीची घटस्फोटाची याचिका मंजूर करण्यात आली होती. न्यायालयाने म्हटले की, पती-पत्नीने आक्षेप घेऊनही अश्लील चॅटिंग सुरू ठेवले, तर ते निश्चितच जोडीदारावर मानसिक क्रौर्य केल्यासारखे आहे आणि ते घटस्फोटाचे कारण ठरते. (वृत्तसंस्था)
पत्नीचा दावा फेटाळला
पत्नीने पतीचे आरोप फेटाळत म्हटले होते की, पतीने मोबाइल हॅक करून पुरुषांना मेसेज पाठवले. मोबाइलवरून चॅट मिळवून गोपनीयतेचे उल्लंघन केले. न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला. अनेक दशकांपासून प्रॅक्टिस करत असलेल्या महिलेच्या वकील वडिलांनी मुलीला पुरुषांनी चॅट करण्याची सवय असल्याचे मान्य केले.