ओबामांसाठी टेहळणी उपग्रह तैनात करणार
By Admin | Updated: January 6, 2015 23:54 IST2015-01-06T23:54:32+5:302015-01-06T23:54:32+5:30
अमेरिकेची गुप्तचर सेवा आगामी भारत दौऱ्यासाठी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तयारी करताना सुरक्षेत केसाएवढीही त्रुटी राहणार नाही याची खबरदारी घेत आहे.

ओबामांसाठी टेहळणी उपग्रह तैनात करणार
नवी दिल्ली : अमेरिकेची गुप्तचर सेवा आगामी भारत दौऱ्यासाठी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तयारी करताना सुरक्षेत केसाएवढीही त्रुटी राहणार नाही याची खबरदारी घेत आहे.
ईगल आय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकी गुप्तचर सेवेचे अत्याधुनिक पथक यापूर्वीच भारतात दाखल झाले असून ते राष्ट्राध्यक्षांच्या कार्यक्रमपत्रिकेवरील विविध स्थळांच्या सुरक्षेचा भारतीय सुरक्षा संस्थांसोबत आढावा घेत आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे बराक ओबामा हे पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्राध्यक्षांच्या प्रत्येक हालचालीचा माग ठेवण्यासाठी अमेरिकी गुप्तचर सेवा उपग्रहाद्वारे टेहळणी करणार असल्याचे वृत्त आहे. ओबामा राजपथावरून मार्गक्रमण करत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या कक्षात येऊन स्थानापन्न होईपर्यंत उपग्रहांची सभोवती अत्यंत बारीक नजर असेल. गुप्तचर सेवेच्या अनेक एजंटशिवाय अमेरिका ओबामांच्या सुरक्षेसाठी अमेरिकी नौसैनिकांचे एक खास पथकही पाठवत आहे. अमेरिकी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेत नेमबाजांचे पथक व शोधकश्वानांच्या पथकाचाही समावेश आहे. ओबामांभोवतीचे पहिले सुरक्षा कडे अमेरिकी सुरक्षा दलांचे असेल, तर दुसरे कडे भारताचे एनएसजी कमांडो व तिसरे कडे दिल्ली पोलिसांचे असणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)