रुग्णावर उपचार करताना निपाह व्हायरचा संसर्ग होऊन नर्सचा मृत्यू, पतीसाठी लिहिलं भावनिक पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 10:55 IST2018-05-22T10:55:08+5:302018-05-22T10:55:08+5:30
निपाहचा संसर्ग कुटुंबातील इतर सदस्यांना होऊ नये यासाठी लिनी यांनी स्वतःला कुटुंबापासून लांब ठेवलं.

रुग्णावर उपचार करताना निपाह व्हायरचा संसर्ग होऊन नर्सचा मृत्यू, पतीसाठी लिहिलं भावनिक पत्र
कोइकोड- केरळच्या कोइकोड जिल्ह्यात पसरलेल्या निपाह व्हायरसच्या संसर्गाने आत्तापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पेरांबरा तालुका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या लिनी (वय 31) नावाच्या नर्सचाही समावेश आहे. निपाहचा संसर्ग कुटुंबातील इतर सदस्यांना होऊ नये यासाठी लिनी यांनी स्वतःला कुटुंबापासून लांब ठेवलं. निपाह व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांवर उपचार करतानाचं लिनी यांना संसर्ग झाला होता. सर्वात दुर्देव म्हणजे लिनी यांचा मृतदेह घरी न आणता आरोग्य विभागाच्या विद्युत स्मशानभूमीत नेला. त्यामुळे लिनी यांच्या कुटुंबीयांना त्यांना शेवटच्या क्षणही पाहता आलं नाही.
लिनीने चंगारोठच्या निपाह व्हायरसची लागण झालेल्या एका तरूणावर उपचार केले होते पण नंतर त्याचा मृत्यू झाला. त्यामुळेच तिला संसर्ग झाला असावा, असं त्यांचे मामा वी बालन यांनी म्हटलं. लिनी नेहमी दुसऱ्यांसाठी जगायची असंही ते म्हणाले. लिनीला सिद्धार्थ (वय 5), रितुल (वय 2) अशी दोन मुलं आहेत. या दोन्ही मुलांनाही त्यांच्या आईला शेवटचं पाहता आलं नाही. लिनी यांच्या आजारपणाबद्दल समजल्यावर त्यांचे पती सजीश लिनीही आखाती देशातून परतले होते.
पर्यटन मंत्री कदाकमपल्ली सुरेंद्रन यांनी लिनीच्या मृत्यूवर संवेदना व्यक्त करत लिनी यांनी त्यांच्या पतीसाठी लिहिलेलं पत्र शेअर केलं आहे. 'मी तुम्हाला आता भेटीन असं मला वाटत नाही. मुलांची काळजी घ्या. तुमच्याबरोबर मुलांनाही बाहेरगावी घेऊन जा. व माझ्या वडिलांप्रमाणे एकट राहू नका', असं पत्र त्यांनी लिहिलं होतं.