Crime: तीन वर्षांच्या मुलासह महिलेची सातव्या मजल्यावरून उडी; सासरच्या लोकांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 15:01 IST2025-10-23T14:56:00+5:302025-10-23T15:01:08+5:30
Gurugram Suicide News: हरियाणातील गुरुग्राम येथे बुधवारी अत्यंत धक्कादायक घटना घडली.

Crime: तीन वर्षांच्या मुलासह महिलेची सातव्या मजल्यावरून उडी; सासरच्या लोकांवर गंभीर आरोप
हरियाणातील गुरुग्राम येथे बुधवारी अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका २७ वर्षीय नर्सने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सासरच्या छळाला कंटाळून नर्सने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.
वजीरपूर येथील सिद्धार्थ एन्क्लेव्ह परिसरातील सिग्नेचर टॉवर येथे ही घटना घडली. मृत सरमिता ही पारस रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती. तर, तिचा पती रोहित यादव एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्यांचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींकडून सरमिताचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला, असा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला.
वाद वाढत असताना, सरमिताच्या पालकांनी अनेक वेळा मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. घटनेच्या आदल्या दिवशी, म्हणजेच मंगळवारी, सरमिताच्या माहेरकडील सदस्य या वादावर चर्चा करण्यासाठी तिच्या घरी आले. ते परत गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, बुधवारी सरमिताने आपला मुलगा युवान याला घेऊन इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. घटनेची माहिती मिळताच उपस्थित लोकांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांकडून तपास सुरू सेक्टर ९३ पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी जगदीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. मृत महिलेच्या पालकांनी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, त्यांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी मृत महिलेच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूंच्या सहमतीनंतरच मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाईल. पालकांनी तक्रार दाखल केल्यास, हुंडाबळी आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.