नुपूर शर्मा प्रकरण: इस्लामिक देशांची संघटना OICला भारताने सुनावले खडेबोल, त्या आरोपांना दिलं चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 17:36 IST2022-06-06T17:35:30+5:302022-06-06T17:36:22+5:30
Nupur Sharma case: नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या टिप्पणीनंतर इस्लामिक देशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तसेच इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीने भारतावर टीका केली होती. त्याला आता भारत सरकारकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

नुपूर शर्मा प्रकरण: इस्लामिक देशांची संघटना OICला भारताने सुनावले खडेबोल, त्या आरोपांना दिलं चोख प्रत्युत्तर
नवी दिल्ली - नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांबाबत केलेल्या टिप्पणीनंतर इस्लामिक देशांमध्ये संतापाची लाट उसळली होती. तसेच इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीने भारतावर टीका केली होती. त्याला आता भारत सरकारकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले असून, ओआयसीला खडेबोल सुनावण्यात आले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, भारत ओआयसीच्या सचिवालयाकडून करण्यात आलेल्या अनावश्यक आणि कोत्या मानसिकतेतून केलेल्या टिप्पणीला फेटाळून लावत आहे. तसेच भारत सर्व धर्मांप्रति सर्वोच्च सन्मान ठेवतो, असेही भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बागची यांनी सांगितले की, काही व्यक्तींनी एका पूजनीय व्यक्तिमत्वाबाबत आक्रमक टिप्पणी आणि ट्विट केली होती. ही टिप्पणी कुठल्याही रूपात भारत सरकारच्या विचारांचे प्रदर्शन करत नाही. त्यांनी सांगितले की, संबंधित संघटनेने या व्यक्तींवर कठोर कारवाई केली आहे.
भाजपाने वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना रविवारी पक्षातून निलंबित केले. तर दिल्ली विभागाचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनाही पक्षातून हाकलण्याचा निर्णय घेतला. दोन्ही नेत्यांच्या वादग्रस्त टिप्पणींबाबत आखाती देशांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला होता.
या वक्तव्यांवर मुस्लिम समुदायाकडून होत असलेल्या विरोधानंतर भाजपाने या दोन्ही नेत्यांच्या विधानापासून स्वत:ला वेगळे केले. तसेच पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो, असे सांगितले. दरम्यान, अरिंदम बागची यांनी सांगितले की, ओआयसी सचिवालयाने पुन्हा एकदा विशिष्ट्य हेतून प्रेरित, दिशाभूल करणारी आणि खोडसाळ टिप्पणी केली आहे. ही टिप्पणी निश्चितपणे स्वार्थी तत्त्वांच्या शहावर त्यांच्या फुटिरतावादी अजेंड्याला उघड करते.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त्यांनी ओआयसीच्या टिप्पणीवर प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना पुढे सांगितले की, आम्ही ओआयसीच्या सचिवालयाला विनंती करतो की, त्यांनी सांप्रदायिक मार्गावर पुढे जाणे बंद करावे. तसेच सर्व धर्म आणि आस्थांबाबत सन्मान ठेवा. ओआयएने मोहम्मद पैगंबरांबाबत झालेल्या टिप्पणीवरून भारतावर टीका केली होती. तसेच भारतामध्ये मुस्लिमांच्या संरक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली होती.