राजस्थानच्या रुग्णालयात मरण पावलेल्या अर्भकांची संख्या १०० वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 07:05 IST2020-01-03T02:32:23+5:302020-01-03T07:05:41+5:30
विरोधकांची सरकारवर टीका; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे राज्य सरकारला पत्र

राजस्थानच्या रुग्णालयात मरण पावलेल्या अर्भकांची संख्या १०० वर
कोटा : येथील जे. के. लोन शासकीय रुग्णालयात डिसेंबरच्या अखेरच्या दोन दिवसांत आणखी नऊ अर्भकांचा मृत्यू झाला. त्यामुळे या महिन्यात तेथे मरण पावलेल्या अर्भकांची संख्या १०० झाली आहे. अर्भक मृत्यू प्रकरणात लक्ष घालण्याबद्दलचे पत्र केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना लिहिले आहे.
याआधी या रुग्णालयात २३ व २४ डिसेंबर रोजी १० अर्भके मरण पावली होती. त्यासंदर्भात राजस्थान सरकारवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये या रुग्णालयात मरण पावलेल्या अर्भकांची संख्या कमी आहे, अशी सारवासारव रुग्णालयाने केली होती. या रुग्णालयात २०१८ सालीही १००५ अर्भकांचा मृत्यू झाला होता. जन्मत:च अत्यंत कमी वजन व प्रतिकारशक्ती असलेल्या अर्भकांचाच मृत्यू ओढावल्याचेही जे. के. लोन रुग्णालयाच्या अधीक्षकांनी म्हटले होते.
भाजपचे खासदार लॉकेट चॅटर्जी, कांता कर्दम, जसकौर मीना यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर तेथील स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. उपचार सुरू असलेल्या दोन ते तीन अर्भकांना एकाच खाटेवर ठेवल्याचे त्यांना आढळून आले. या रुग्णालयात पुरेशा संख्येने परिचारिका नाहीत, असे त्यांना दिसले.
अर्भकांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय बालहक्क रक्षण आयोगाने राजस्थान सरकारला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या रुग्णालयाच्या आवारात डुकरे फिरताना आढळून आली, असे आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी म्हटले आहे. जे. के. लोन रुग्णालयात अर्भकांवर योग्य उपचार करण्यात येत होते, असा दावा राजस्थान सरकारने केला होता. (वृत्तसंस्था)
राजकीय भांडवल करू नका : अशोक गेहलोत
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे की, कोटाच्या रुग्णालयातील अर्भकांच्या मृत्यू प्रकरणाचे कोणीही राजकीय भांडवल करू नये.
केंद्र सरकारकडून येणाऱ्या शिष्टमंडळाने जे. के. लोन शासकीय रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर तेथे आणखी कोणत्या वैद्यकीय सुविधा असाव्यात याविषयी शिफारशी कराव्यात. त्याची पूर्तता राजस्थान सरकारकडून केली जाईल, असेही ते म्हणाले. या प्रकरणाची माहिती काँग्रेसचे राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडेय यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना गुरुवारी दिली.