The number of corona patients under treatment is less than 2 lakh | उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांपेक्षा कमी, बरे झाले १ कोटी २ लाख रुग्ण; मृत्यूदर १.४४ टक्के

उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांपेक्षा कमी, बरे झाले १ कोटी २ लाख रुग्ण; मृत्यूदर १.४४ टक्के

नवी दिल्ली : देशामध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या २ लाखांपेक्षा कमी असून, बळींच्या संख्येतही घट झाली आहे. देशात कोरोनाचे रुग्ण १ कोटी ६ लाखांच्या घरात असून, त्यातील १ कोटी २ लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत. त्यांचे प्रमाण ९६.७० टक्के आहे. 

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी १३,८२३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर १६२ जण मरण पावले. कोरोना बळींची एकूण संख्या आता १,५२,७१८ झाली आहे, तर बरे झालेल्यांची संख्या १,०२,४५,७४१ झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.४४ टक्के आहे. देशात सध्या १,९७,२०१ कोरोना रुग्ण असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या १.८६ टक्के आहे. 

अमेरिकेत २ कोटी ४८ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील १ कोटी ४७ लाख बरे झाले, तर ९६ लाख ११ हजार लोक उपचाराधीन आहेत. अमेरिकेत ४ लाख ११ हजार लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. भारतामध्ये कोरोना रुग्ण, उपचाराधीन रुग्ण, बळींची संख्या ही अमेरिकेपेक्षा कमी आहे. जर्मनीमध्ये कोरोना साथीमुळे घातलेल्या निर्बंधांची मुदत १४ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्याचा निर्णय त्या देशाच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी घेतला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

जगात कोरोनाचे ९ कोटी ६६ लाख रुग्ण -
जगामध्ये कोरोनाचे ९ कोटी ६६ लाख रुग्ण असून, त्यातील ६ कोटी ९३ लाख लोक बरे झाले आहेत तर २० लाख ६६ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगात २ कोटी ५२ लाख उपचाराधीन रुग्ण आहेत.

नव्या कोरोना विषाणूचा ६० देशांत संसर्ग -
- जिनिव्हा : ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूचा जगातील ६० देशांत संसर्ग झाला आहे. ही माहिती जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिली. 

- आठवड्यापूर्वी अशा देशांची संख्या ५० होती. कोरोना विषाणूची साथ जगभरात पसरली असून त्यामुळे २० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या साथीवर काही प्रतिबंधक लसी विकसित झाल्या आहेत. त्यांची लसीकरण मोहीमही सुरू झाली आहे.

- दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कोरोनाचा नवा विषाणू हा अधिक घातक असून, तो २३ देशांमध्ये सापडला आहे. गेल्या आठवड्यात जगभरात ९३ हजार जणांचा मृत्यू झाला तर ४७ लाख नवे रुग्ण आढळून आले.  अमेरिका, युरोप व भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. 
भूतान, मालदीवसह काही देशांत लसी रवाना -
स्वदेशी बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लसी भारताने भूतान, मालदीव, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स, बांगलादेश, श्रीलंका या देशांना रवाना केल्या आहेत. या माध्यमातून शेजारी देशांसह जगातील इतर देशांबरोबर संबंध अधिक दृढ करण्याची रणनीती केंद्र सरकारने आखली आहे.

१,००,००० कोविशिल्ड या लसींचे डोस भूतान व मालदीवला बुधवारी पाठविण्यात आले. या लसींचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूटने केले आहे. 

अनेक देशांनी केली विनंती -
केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटले आहे की, कोरोना साथीतून जगाला मुक्त करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांत भारतही सहभागी आहे. कोरोना  लसींचा पुरवठा करावा, अशी विनंती अनेक देशांनी भारताला केल्याचे परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. तसेच, विविध देशांना कोरोना लसींचा पुरवठा बुधवारपासून सुरू झाला असून, तो यापुढील काळातही सुरू राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

बर्ड फ्लूवरील प्रभावी लसी द्या
चंदीगढ : बर्ड फ्लूच्या एच५एन८ या व अन्य प्रकारच्या विषाणूंचा नायनाट करणाऱ्या लसी अनेक देशांत उपलब्ध आहेत. बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांना ठार मारण्याऐवजी त्यांना या लसी देण्याचा मार्ग केंद्र सरकारने अवलंबावा तसेच या लसी भारतात आणण्यास परवानगी द्यावी, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. बर्ड फ्लूवर प्रभावी ठरणाऱ्या लसी तस्करी करून भारतात आणण्याचे प्रकारही घडत आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The number of corona patients under treatment is less than 2 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.