अस्थानांविरुद्धच्या तपासात दोवाल यांचा हस्तक्षेप; सीबीआय अधिकाऱ्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 04:43 AM2018-11-20T04:43:12+5:302018-11-20T04:43:36+5:30

सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्धच्या दोन कोटी रुपयांच्या लाच घेतल्याच्या आरोपाच्या तपासात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी हस्तक्षेप केला.

NSA Ajit Doval Interfered in Probe Against Asthana: CBI DIG | अस्थानांविरुद्धच्या तपासात दोवाल यांचा हस्तक्षेप; सीबीआय अधिकाऱ्याचा आरोप

अस्थानांविरुद्धच्या तपासात दोवाल यांचा हस्तक्षेप; सीबीआय अधिकाऱ्याचा आरोप

googlenewsNext

नवी दिल्ली : सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्धच्या दोन कोटी रुपयांच्या लाच घेतल्याच्या आरोपाच्या तपासात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी हस्तक्षेप केला व अस्थानांच्या घराची झडती घेण्यातही त्यांनी खोडा घातला, असा आरोप सीबीआयच्या वरिष्ठ अधिका-याने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केला.
आलोक वर्मा यांनी त्या कारवाईविरुद्ध केलेली याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्याच याचिकेत सहभागी होण्यासाठी केलेल्या अर्जात मनीष कुमार सिन्हा यांनी हा आरोप केला. सिन्हा उपमहानिरीक्षक असून, अस्थाना यांच्याविरुद्धच्या तपासात ते पर्यवेक्षक अधिकारी होते. वर्मा व अस्थाना यांना रजेवर पाठविल्यानंतर नेमलेले हंगामी संचालक नागेश्वर राव यांनी सिन्हा यांची बदली नागपूरला केली. अस्थाना यांना वाचविण्यासाठी सरकारमधील उच्चपदस्थांच्या इशाºयावरून केलेली ही अन्याय्य बदली रद्द करावी, अशी त्यांची विनंती आहे. सिन्हांचे अ‍ॅड. सुनील फर्नांडिस यांनी अर्जात धक्कादायक माहिती असल्याचे सांगून लगेच सुनावणीची विनंती केली; सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी ती अमान्य केली. सतीश बाबू सानाच्या तक्रारीवरून अस्थाना यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला गेला. सीबीआयतील प्रकरणे मिटविण्यासाठी केंद्रीय कोळसा व खाण राज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनाही आपण कित्येक कोटींची लाच दिल्याचे साना यांनी सांगितल्याचाही आरोप सिन्हांच्या अर्जात आहे. राज्यमंत्री चौधरी गुजरातचे असून, ते मोदींच्या जवळचे मानले जातात. सिन्हा यांनी अर्जात दावा केला की, फोन संभाषणांवर नजर ठेवली असता ‘पीएमओ’ने सीबीआयचा विषय मॅनेज केला आहे’, असे ‘रॉ’मधील अधिकारी सामंतकुमार गोयल सांगत असल्याचे ऐकू येते. ज्या दिवशी हे संभाषण झाले त्याच रात्री अस्थाना यांचा तपास करणारे तपास पथक बदलण्यात आले.

वर्मा यांचे उत्तर दाखल
वर्मा यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होईल. आपल्याविरुद्धच्या सीव्हीसी अहवालावरील आपले म्हणणे वर्मा यांनी आज सादर केले. त्याआधी त्यांनी उत्तरास आणखी वेळ द्यावा, अशी विनंती केली; परंतु ती अमान्य करताना न्या. गोगोई म्हणाले की, उद्याची सुनावणी पुढे ढकलणार नाही. त्याआधी तुमचे उत्तर वाचायचे असल्याने ते दिवसभरात सादर करा.

Web Title: NSA Ajit Doval Interfered in Probe Against Asthana: CBI DIG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.