आता २१ दिवसांत मिळणार विमान तिकिटाचा रिफंड; DGCA ने सादर केला सुलभ प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 08:03 IST2025-11-05T08:03:16+5:302025-11-05T08:03:39+5:30
दोन वर्षांपासून देशात विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ

आता २१ दिवसांत मिळणार विमान तिकिटाचा रिफंड; DGCA ने सादर केला सुलभ प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महागडी विमान तिकिटे काढून जर ऐनवेळी ती रद्द करण्याची वेळ आली तर त्यावर बसणारा भुर्दंड आणि पैसे परत मिळवण्यासाठी करावी लागणारी डोकेफोड दूर करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रवासी सुलभ प्रस्ताव सादर केला आहे. कारण आता तिकिटाचा रिफंड २१ दिवसांत मिळणार आहे.
डीजीसीएच्या प्रस्तावानुसार, प्रवाशांनी जर थेट विमान कंपनीकडून तिकीट खरेदी केले असेल किंवा एजंटमार्फत विमानाचे तिकीट खरेदी केले असले तर त्याला त्याच्या तिकिटाचा रिफंड २१ दिवसांत परत मिळणार आहे.
‘डीजीसीए’ने हा निर्णय का घेतला?
प्रवाशाला प्रवाशाला आपल्या प्रवासाचे पुनर्नियोजन करायचे असेल तर तिकीटाच्या दरातील तफावतीच्या दराखेरीज अन्य अतिरिक्त शुल्क न आकारता त्याला ते ४८ तासांच्या आत करणे शक्य होणार आहे. हा प्रस्ताव तयार केला असून यासंदर्भात सर्व विमान कंपन्यांसोबत बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
दोन वर्षांपासून देशात विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि त्या तुलनेत विमानांच्या संख्येत असलेली तफावत यामुळे प्रवासाचे दर वर्षभर गगनाला भिडल्याचे दिसते. अशा स्थितीत विमान तिकीट रद्द झाले तर कंपन्या घसघशीत शुल्क आकारणी करतात आणि प्रवाशाच्या हाती फारसे काही लागत नाही. या पार्श्वभूमीवर प्रवाशाचे नुकसान होऊ नये, याकरिता प्रवाशांच्या हितासाठी हा प्रस्ताव तयार केला आहे.