आता पेपर फोडणाऱ्यांची संपत्तीही होणार जप्त; बिहार पोलिस करणार कडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 06:58 IST2024-07-05T06:58:04+5:302024-07-05T06:58:32+5:30
पोलिस भरतीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडल्याबद्दल बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोलकातातील एक बनावट कंपनीच्या संचालकासह किमान सहा लोकांना यापूर्वी अटक केली होती.

आता पेपर फोडणाऱ्यांची संपत्तीही होणार जप्त; बिहार पोलिस करणार कडक कारवाई
विभाष झा
पाटणा - परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडण्याचे गैरकृत्य करणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्याचा बिहार सरकार विचार करत आहे. त्या राज्यातील पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तशी कारवाई होण्याची शक्यता आहे.
बिहार लोकसेवा आयोगामार्फत (बीपीएससी) घेतलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणारे आरोपी अद्याप फरार असून, त्यांना पकडण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत. शिक्षक भरती परीक्षेतही काही गैरप्रकार झाले होते. त्यातील सूत्रधारासहित काही आरोपींना याआधीच अटक करण्यात आली आहे. पोलिस भरतीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडल्याबद्दल बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोलकातातील एक बनावट कंपनीच्या संचालकासह किमान सहा लोकांना यापूर्वी अटक केली होती.
कारस्थानाचा सूत्रधार शोधणार;आणखी कठोर पावले उचलणार
नीट-यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या कारस्थानाचा सूत्रधार संजीव मुखियासहित काही लोकांचा बिहार पोलिस शोध घेत आहेत. फरारी आरोपींनी लवकर शरणागती पत्करली नाही तर त्यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जाईल. परीक्षांमध्ये
गैरव्यवहार करणाऱ्यांना जरब बसावी म्हणून बिहार सरकार भविष्यात आणखी कठोर पावले उचलणार असल्याचेही कळते.