आता सत्ताधाऱ्यांकडे आयकरचे अधिकारी पोहोचले, घबाड सापडले! १९ किलोंचे सोने, लक्झरी गाड्यांची फौज आणि करोडोंमध्ये कॅश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 11:23 IST2025-01-08T11:22:15+5:302025-01-08T11:23:00+5:30
Income Tax Raid: छाप्यात असे कारनामे उघड झाले आहेत की त्यांची मोजदाद करता करता आयकरच्या टीमची कंबर मोडून गेली आहे.

आता सत्ताधाऱ्यांकडे आयकरचे अधिकारी पोहोचले, घबाड सापडले! १९ किलोंचे सोने, लक्झरी गाड्यांची फौज आणि करोडोंमध्ये कॅश
गेल्या काही वर्षांपासून आयकर विभाग, ईडी, सीबीआय हे विरोधकांना लक्ष्य करत असल्याचे आरोप होत होते. परंतू, आता आयकर विभागाने भाजपाच्या म्हणजेच केंद्रात आणि राज्यातही सत्तेत असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या माजी आमदाराच्या घरावर छापे मारले आहेत. या छाप्यात असे कारनामे उघड झाले आहेत की त्यांची मोजदाद करता करता आयकरच्या टीमची कंबर मोडून गेली आहे.
बंडा येथील भाजपाचे माजी आमदार हरवंश सिंह राठौर आणि माजी नगरसेवक राजेश केशरवानी यांची कंपनी आणि घरांवर आयकर विभागाने छापा मारला आहे. या छाप्यात १५० कोटींहून अधिक रकमेची करचोरी सापडली आहे. एवढेच नाही तर २०० कोटींहून अधिक मालमत्ता सापडली आहे. यात तीन ठिकाणांहून १९ किलो सोने, १४४ कोटींचे रोखीने केलेले व्यवहार आणि ७ कोटी रुपयांच्या लक्झरी कार सापडल्या आहेत.
कर चोरी, पैशांची अफरातफर, बांधकाम आणि दारू-सिगारेट व्यापार यातून या दोघांनी माया जमविली होती. रविवारी पहाटे हा छापा टाकण्यात आला होता. माजी आमदारांचे भाऊ कुलदीप हे दारुचा व्यवसाय करतात. त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. दुसऱ्या टीमने केशरवानी आणि त्यांचे साथीदार राकेश छावडा यांच्या घरावर छापा मारला.
तीन दिवस हा छापा सुरु होता. सुमारे ५० गाड्या या छाप्यासाठी आल्या होत्या. अजून शोध सुरु असल्याचे आयकर विभागाने सांगितले आहे. आता या प्रकरणात ईडीची एंन्ट्री देखील होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. माजी आमदाराच्या घरातून १४ किलो सोने आणि ३.८ कोटी रोख पकडण्यात आली आहे. तर केशरवानी यांच्याकडून १४० कोटींहून जास्तीचे रोखीने व्यवहार, ७ कार आणि ४.७ किलो सोने सापडले आहे. यापैकी सोन्याच्या खरेदीचे कागदपत्र केशरवानी यांनी दाखविल्याने ते अद्याप जप्त करण्यात आलेले नाही.