मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 07:58 IST2025-12-08T07:56:58+5:302025-12-08T07:58:06+5:30
शिक्षण मंत्रालयाच्या पुढाकारानंतर आता यूजीसीने सर्व उच्चशिक्षण संस्थांमध्ये “Learn One More Bharatiya Bhasha” मोहिम सुरू करत त्याबाबत नियमावली जारी केली आहे

मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
नवी दिल्ली - शाळेत पाचवी वर्गापर्यंत मातृभाषा शिकणे बंधनकारक केल्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाने उच्च शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय भाषेकडे आकर्षिक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ज्यात विद्यार्थ्यांना मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकण्यासाठी प्रेरित करण्यास सांगितले आहे. संविधानाच्या ८ व्या अनुसूचीत समाविष्ट २२ भारतीय भाषांना यात ठेवले आहे. यात कुठलेही बंधन नसून आपल्या पसंतीने कोणतीही भाषा निवडू शकता. उच्च शिक्षणात बहुभाषी, समृद्ध आणि रोजगार संधी उपलब्ध व्हावी यासाठी भारतीय भाषा समिती आणि यूजीसीने मिळून ही मोहिम हाती घेतली आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने(UGC) सर्व राज्यांना पत्र लिहिलं आहे.
मातृभाषेसोबत आणखी एक भाषा
भारतीय भाषांना चालना देण्यासाठी नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि शिक्षण मंत्रालयाच्या पुढाकारानंतर आता यूजीसीने सर्व उच्चशिक्षण संस्थांमध्ये “Learn One More Bharatiya Bhasha” मोहिम सुरू करत त्याबाबत नियमावली जारी केली आहे. सर्व विद्यापीठे, कॉलेज, तंत्रज्ञान संस्थांना या मोहिमेत सहभागी होण्यास सांगितले आहे. यूजीसीने सर्व उच्च शिक्षण संस्थांना त्यांच्या गरजा आणि रोजगाराच्या संधींनुसार क्षमता वाढ, क्रेडिट आणि ऑडिट सारखे अभ्यासक्रम तयार करण्यास सांगितले आहे. ऑडिट अभ्यासक्रमांचा अर्थ फक्त शिकणे आणि समजून घेणे असा आहे. यूजीसीने उच्च शिक्षण संस्थांना हे अभ्यासक्रम ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे आयोजित करण्यास सांगितले आहे.
यात प्रवेश घेणाऱ्यांना कधीही प्रवेश किंवा बाहेर पडण्याचा पर्याय देण्याच्याही सूचना आहेत. या कोर्समध्ये १२ वीनंतरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा सल्ला दिला आहे. या मोहिमेमुळे देशातील लोकांमध्ये सांस्कृतिक, व्यावसायिक संबंध आणखी मजबूत होतील. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून जास्तीत जास्त भारतीय भाषांशी निगडित कोर्स सुरू करण्यास सांगितले आहे. एकापेक्षा जास्त भारतीय भाषा शिकणाऱ्याला लिपी गौरव, भाषा दूत, भाषा मित्र यासारख्या उपाधीने सन्मानित करा. पाच अथवा त्याहून अधिक भारतीय भाषा शिकणाऱ्यांना दरवर्षी ११ डिसेंबरला आयोजित होणाऱ्या भारतीय भाषा उत्सवात सन्मानित केले जाईल. भारतीय भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांनाही सन्मान दिला जाईल. सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये वेगवेगळ्या भारतीय भाषांचे प्रशिक्षक तयार करा.
कोर्स कसा असेल?
दरम्यान, उच्च शिक्षण संस्थेत अन्य भारतीय भाषा शिकण्यासाठी त्रिस्तरीय कोर्स असेल. त्यात बेसिक, इंटरमीडिएट आणि एडवान्स कोर्स शिकवले जातील. त्यासाठी ३ पर्याय दिलेत. एबिलीटी एन्हांसमेंट कोर्स त्यातून क्रेडिट मिळेल. क्रेडिट कोर्स ज्यात डिग्रीमध्ये काऊंट होईल. ऑडिट कोर्स - केवळ शिकण्यासाठी असेल. विद्यार्थी त्यात एन्ट्री आणि एक्झिट घेऊ शकतात. ३ वेगवेगळ्या सेमिस्टरमध्ये हे कोर्स चालवू शकता. जर कॉलेज ऑनलाईन कोर्स चालवत असेल तर त्यासाठी १६ वर्षावरील म्हणजे कमीत कमी १२ वी पास केलेले हे कोर्स घेऊ शकतात.
काय असेल फायदा?
हे कोर्स फक्त भाषा शिकण्याबद्दल नाही. यामुळे विद्यार्थ्यांची आंतरसांस्कृतिक समज वाढेल, संवाद कौशल्ये सुधारतील आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. यामुळे रोजगार क्षमता वाढेल आणि विकसित भारताचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल असं सांगण्यात येत आहे.