प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:56 IST2025-12-12T13:54:12+5:302025-12-12T13:56:01+5:30
Ram Mandir In West Bengal: २०२६ मधील राम नवमीच्या दिवशी पश्चिम बंगालमध्ये राम मंदिर भूमिपूजनाचा संकल्प भाजपा नेत्यांनी घेतल्याचे म्हटले जात आहे.

प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
Ram Mandir In West Bengal: तृणमूल कांग्रेसचे निलंबित आमदार हुमायूं कबीर हे बंगालमध्ये बाबरी मशिदीची उभारणी करण्याची घोषणा करून सध्या चर्चेत आले आहेत. हुमायूं कबीर यांच्या समर्थकांनी विटा घेऊन आगेकूच सुरू केल्याचे फोटोही समोर आले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यातच आता एका भाजपा नेत्यांनी पश्चिम बंगलामध्ये राम मंदिर बांधले जाणार असल्याचे म्हटले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. कोलकाता येथील सॉल्ट लेक परिसरात अनेक ठिकाणी काही पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामध्ये अयोध्याप्रमाणे भव्य राम मंदिर संकुल बांधण्याचा दावा करण्यात आला आहे. हे पोस्टर्स स्थानिक भाजपा नेते आणि पक्षाच्या विधाननगर युनिटचे माजी अध्यक्ष संजय पोयरा यांच्या नावाने लावण्यात आले आहेत. राम मंदिराच्या बांधकामासाठी प्रत्येकी एक रुपया देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राम नवमीच्या दिवशी सकाळी १० वाजता भूमिपूजन
संजय पोयरा यांनी सांगितले की, रामराज्यात राम मंदिर असले पाहिजे. अयोध्येतील राम मंदिरासारखेच विधाननगरमध्येही राम मंदिर बांधले जाईल. अनेक लोकांनी आधीच जमीन, बांधकाम साहित्य आणि मूर्ती दान करण्याची ऑफर दिली आहे. संजय पोयरा यांनी घोषणा केली की, २६ मार्च रोजी रामनवमी दिवशी सकाळी १० वाजता भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ होईल. ही एक सामाजिक, अध्यात्मिक चळवळ असेल. राम मंदिराच्या बांधकामासाठी १ रुपये दान करायचे असेल तर आनंदाने स्वीकारली जाईल, असेही पोयरा म्हणाले.
दरम्यान, बाबरी मशीद पाडण्याचा स्मरण दिन म्हणून निलंबित तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी मुर्शिदाबादमधील रेजीनगर येथे बाबरी-मॉडेल मशिदीची पायाभरणी केली. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते संजय पायरा यांच्या नावे लावले गेलेले राम मंदिर बांधण्याबाबतचे पोस्टर लक्ष वेधून घेत आहेत.