अयोध्येतील राम मंदिरात आता रामललाचे दर्शन घेताच भाविकांना सीतामाईचेही आशिर्वाद लाभणार; कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 19:05 IST2025-04-01T19:01:10+5:302025-04-01T19:05:03+5:30

Ayodhya Ram Mandir News: अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी राम मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

now ram devotees will get the ram lalla prasad with the darshan in ram mandir sita rasoi will work continuously | अयोध्येतील राम मंदिरात आता रामललाचे दर्शन घेताच भाविकांना सीतामाईचेही आशिर्वाद लाभणार; कसे?

अयोध्येतील राम मंदिरात आता रामललाचे दर्शन घेताच भाविकांना सीतामाईचेही आशिर्वाद लाभणार; कसे?

Ayodhya Ram Mandir News: अयोध्येतील राम मंदिराचे आकर्षण यच्किंचितही कमी झालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे लोकार्पण करून एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी राम मंदिरात रामललाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटत आहे. अयोध्येतील राम मंदिरात आता दुसऱ्यांदा श्रीराम नवमी साजरी केली जाणार आहे. श्रीराम नवमीच्या निमित्ताने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते, असा कयास असून, राम मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. यातच श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून भाविकांसाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

अलीकडेच झालेल्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत येणाऱ्या भाविकांनी आणि पर्यटकांनी आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. अभूतपूर्व गर्दी अयोध्येत लोटली. यातच आता चैत्र महिन्यातील राम नवरात्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवरही अयोध्येत येऊन रामललाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच चालली आहे. यातच आता रामललाचे दर्शन घेतल्यावर भाविकांना राम मंदिरातच प्रसाद देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 

भाविकांना सीतामाईचेही आशिर्वाद लाभणार; कसे?

श्रीराम नवमीच्या निमित्ताने अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन, पूजनासोबतच राम मंदिरातून बाहेर पडताना श्रीरामांचा प्रसाद दिला जाणार आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी राम मंदिर ट्रस्टने आणखी एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता भाविक राम मंदिरातून परततील, तेव्हा त्यांना बाहेर पडण्याच्या मार्गावर भगवान रामाचा प्रसाद दिला जाईल. अंगद टीला येथे राम मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी बाहेर पडण्याच्या मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. राम मंदिर ट्रस्ट सीता रसोई चालवत आहे. राम नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून सुरू झालेली सीता रसोई आता भाविकांसाठी कायम कार्यरत राहणार आहे. सीता रसोईत तयार झालेला प्रसाद पहिल्या दिवशी ७० हजारांहून अधिक रामभक्तांनी घेतला, तर दुसऱ्या दिवशी ही संख्या ५० हजारांच्या वर पोहोचली. राम मंदिर ट्रस्ट संचालित सीता रसोईच्या प्रभारींनी सांगितले की, राम मंदिर ट्रस्टकडून बाहेर पडण्याच्या मार्गावर सीता रसोई चालवली जात आहे. येथे, रामभक्त मोठ्या उत्साहाने रामललाला अर्पण केलेला नैवेद्य हा प्रसाद स्वरुपात घेत आहेत. अयोध्येत पोहोचलेले भाविक मंदिरात दर्शन आणि पूजा केल्यानंतर भावूक होत आहेत आणि राम मंदिर ट्रस्टचे कौतुकही करत आहेत.

दरम्यान, राम मंदिर ट्रस्ट अयोध्येत येणाऱ्या राम भक्तांना मोफत लॉकर सेवा, चरण पादुका सेवा आणि मोफत पास देते. पण आता रामभक्तांना भगवान रामाचा प्रसादही मिळणार आहे. तसेच श्रीराम नवमीच्या निमित्ताने अयोध्येत लाखोंच्या संख्येत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठीही अनेक उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.

 

Web Title: now ram devotees will get the ram lalla prasad with the darshan in ram mandir sita rasoi will work continuously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.