‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 05:14 IST2025-10-19T05:10:20+5:302025-10-19T05:14:57+5:30
पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणारी ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाई हे फक्त एक ट्रेलर होते.

‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
लखनौ: ‘आता पाकिस्तानची एक-एक इंच भूमी ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आहे, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी लखनौस्थित ‘ब्रह्मोस एअरोस्पेस’ या केंद्रात निर्मित क्षेपणास्त्रांच्या पहिल्या बॅचच्या अनावरणप्रसंगी दिला.
‘आता विजय आपल्यासाठी छोटी घटना नाही, उलट ही आपली सवय झाली आहे. हीच सवय कायम राखण्यासह ती अधिक दृढ करण्याचा संकल्प आता केला पाहिजे’, असे ते म्हणाले. देशाच्या कोणत्याही भागात जेव्हा कधी ब्रह्मोसचे नाव घेतले जाते तेव्हा लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत, महिलांच्याही मनात या क्षेपणास्त्रांची विश्वासार्हता घर करते, असे ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर एक ट्रेलर
पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणारी ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाई हे फक्त एक ट्रेलर होते. या माध्यमातून शेजारी देशाला जाणीव करून देण्यात आली की भारत पाकिस्तानला जन्म देऊ शकतो तर वेळप्रसंगी...’, एवढे बोलून राजनाथसिंह थोडे थांबले. नंतर लगेच म्हणाले, ‘आता यावर पुढे काही बोलण्याची मला गरज नाही. तुम्ही चांगले समजूतदार आहात.’
लखनौत राजनाथसिंह यांनी ‘टायटॅनियम व सुपल अलॉईज’ सामग्री (उच्च तापमान, दाब किंवा वातावरणात तग धरणारे) निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण केले. खासगी क्षेत्रातील अशा प्रकारची ही पहिली कंपनी असल्याचे ते म्हणाले.
स्वावलंबी भारत हा विचार नव्हे, वास्तव : योगी
स्वावलंबी भारत हा आता केवळ एक विचार राहिलेला नाही, तर हे प्रत्यक्षात येत असलेले एक वास्तव असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. ‘पीटीसी इंडस्ट्रीज’मध्ये आयोजित समारंभात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या नेतृत्वाखाली भारत आता संरक्षण उत्पादनात आत्मविश्वासाने जगासमोर उभा असल्याचे ते म्हणाले.