नोव्हाव्हॅक्स कंपनीचा लसीच्या उत्पादनासाठी सिरमशी करार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 01:12 AM2020-08-07T01:12:53+5:302020-08-07T01:13:02+5:30

मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सप्टेंबरमध्ये; आतापर्यंत निष्कर्ष समाधानकारक

NovaVax Company contracts with Serum for vaccine production | नोव्हाव्हॅक्स कंपनीचा लसीच्या उत्पादनासाठी सिरमशी करार

नोव्हाव्हॅक्स कंपनीचा लसीच्या उत्पादनासाठी सिरमशी करार

Next

नवी दिल्ली : नोव्हाव्हॅक्स इंक ही अमेरिकी कंपनी बनवीत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीबाबतचे संशोधन व उत्पादन करण्याबाबत त्या कंपनीने सिरम इन्स्टिट्यूटशी करार केला आहे. या लसीच्या मानवी चाचणीचा तिसरा टप्पा सप्टेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. नोव्हाव्हॅक्स कंपनीच्या लसीचे भारतात उत्पादन करण्याचा विशेष हक्क या कराराद्वारे सिरम इन्स्टिट्यूटला प्राप्त झाला आहे. उच्च मध्यम किंवा उच्च उत्पन्न असलेले देश वगळता अन्य देशांसाठी कोरोना साथीच्या काळात सिरम इन्स्टिट्यूटला नोव्हाव्हॅक्स लसीचे उत्पादन या कराराद्वारे करता येईल.

नोव्हाव्हॅक्स कंपनीने सिरम इन्स्टिट्यूटशी केलेला करार व्यावसायिकदृष्ट्यााही अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. नोव्हाव्हॅक्स कंपनीने गुरुवारी सांगितले की, आम्ही विकसित करीत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचण्यांतील आतापर्यंतचे सर्व निष्कर्ष समाधानकारक आहेत. रुग्णाला ही लस टोचल्यानंतर त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर अँटिबॉडी तयार होत असल्याचे लसीच्या मानवी चाचण्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये दिसले आहे.
जगभरात भारत, अमेरिकेसह अनेक देश कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी प्रयोग करीत आहेत. ही लस सर्वप्रथम कोण तयार करतो, अशी सुप्त स्पर्धाही या देशांमध्ये आहे. रशियाने कोरोना प्रतिबंधक लस तयार केल्याचा दावा केला असला तरी जगभरातील शास्त्रज्ञांना या लसीच्या गुणवत्तेबद्दल खात्री नाही.

आॅक्सफर्ड विद्यापीठाशीही करारबद्ध
आॅक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेनिसा ही कंपनी विकसित करीत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासंदर्भातही या दोघांनी सिरम इन्स्टिट्यूटशी करार केला आहे. या लसीच्या मानवी चाचण्या भारतात करण्याची परवानगी सिरम इन्स्टिट्यूटला केंद्र सरकारने नुकतीच दिली आहे.

Web Title: NovaVax Company contracts with Serum for vaccine production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.