"सोपं काहीच नव्हतं, पण मी प्रत्येक प्रसंगाशी भिडले..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 14:07 IST2025-05-18T14:06:08+5:302025-05-18T14:07:08+5:30
"...त्याक्षणी मला जाणवलं, की माझं स्वप्न काय आहे. मला पायलट व्हायचं आहे आणि आकाशावर नाव कोरायचं आहे."

"सोपं काहीच नव्हतं, पण मी प्रत्येक प्रसंगाशी भिडले..."
माझा संपूर्ण प्रवास खूपच जबरदस्त, विलक्षण आणि उत्साहवर्धक ठरला. मला अजूनही ती गोष्ट आठवते, जेव्हा मी सहावीत होते. एकदा आमच्या वर्गात ‘नावांचा अर्थ’ यावर चर्चा चालू होती. माझं नाव आहे ‘व्योमिका’. ‘व्योम’ म्हणजे आकाश. मी ते सर्वांना सांगितलं. तेव्हा वर्गात कुणीतरी मागून मोठ्याने म्हटलं, ‘म्हणजे तू तर आकाशाची मालकीण झालीस!’ आणि त्यावर माझ्या शिक्षिकांनीही हसून उत्तर दिलं, ‘हो, असं वाटतं, की हीच त्या आकाशावर राज्य करणार आहे.’ त्याक्षणी मला जाणवलं, की माझं स्वप्न काय आहे. मला पायलट व्हायचं आहे आणि आकाशावर नाव कोरायचं आहे.
सहावीतील क्षणाने माझ्या मनात स्वप्नाचं बीज रोवलं. मी ते स्वप्न मनात घट्ट धरून ठेवलं आणि तेव्हापासून ठरवलं, मी पायलटच होणार. पण हे स्वप्न सहज नव्हतं. १९९१-९२ चा काळ. तेव्हा महिलांना वायुसेनेत पायलट म्हणून संधी दिली जात नव्हती. मला तेवढंच माहीत होतं. शालेय जीवनात मी नियमितपणे ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’मधील सरकारी नोकऱ्यांच्या जाहिराती वाचायची. एक जाहिरात अजूनही लक्षात आहे. त्यातील संधी ही केवळ अविवाहित पुरुष उमेदवारांसाठीच होती. ते वाचून मी खूप निराश झाले. वाटलं, हे स्वप्न आपल्यासाठी नाहीच काय? पण हार मानली नाही. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी मला समजलं की यूपीएससीच्या माध्यमातूनही पायलट होण्याची संधी आहे. मग मी एसएसबीसाठी अर्ज केला. अखेर तो स्वप्नवत क्षण आला. मी एक हेलिकॉप्टर पायलट झाले. त्या दिवसापासून मागे वळून पाहिलंच नाही. हेलिकॉप्टर पायलट म्हणून माझा प्रवास थरारक राहिला. अनेक भूमिका पार पाडाव्या लागल्या. समुद्रसपाटीपासून ते १८ हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण केलं. अनेक वेळा रुग्णवाहतूक मोहिमा राबविल्या. हवामानाच्या अडथळ्यांची अनेक आव्हानं होतीच. पण मी प्रत्येक प्रसंगाशी भिडले. आज अभिमानाने सांगते की, हे सगळं मला मनापासून आवडलं.
आत्मविश्वास अन् बिनधास्तपणा
फक्त पुस्तकी किडा व्हायचं नाही; तर सर्व काही शिकायचं. ७० टक्के अभ्यासावर भर देऊन, उरलेली वेळ इतर कौशल्यांसाठी द्यायची. शालेय जीवनात विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. मुलांपेक्षा स्वतःला कधीच कमी समजले नाही. वर्तन आणि व्यवहारही तसाच होता. पायऱ्या चढताना मुलांप्रमाणे शिट्टी वाजवायची. आई म्हणाली, बेटा हे ठीक नाही. तू मुलगी आहेस. मम्मी मुलगी-मुलगा असं काही नसतं. शिट्टी वाजवायचं लायसन्स काय फक्त मुलांकडेच आहे का?
(संकलन : महेश घोराळे)