५० वर्षांनंतर आपल्या मातृगावात आले थुइंगालेंग मुइवा; आठवडाभरासाठी सोमदल गावात करतील मुक्काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 08:05 IST2025-10-23T08:03:57+5:302025-10-23T08:05:53+5:30
ही भेट, गेल्या काही वर्षांपासून जातीय संघर्षांनी जर्जर झालेल्या या प्रदेशासाठी शांती आणि ऐक्याचे प्रतीक मानली जात आहे.

५० वर्षांनंतर आपल्या मातृगावात आले थुइंगालेंग मुइवा; आठवडाभरासाठी सोमदल गावात करतील मुक्काम
इम्फाळ : नागा आंदोलनाचे प्रणेते आणि नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (NSCN-IM) चे ज्येष्ठ नेते थुइंगालेंग मुइवा तब्बल पाच दशके म्हणजेच ५० वर्षानंतर आपल्या जन्मगावात पाहोचले आहेत. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मणिपूरमधील उखरूल जिल्ह्यातील सोमदल या गावात होणारी त्यांची ही भेट, गेल्या काही वर्षांपासून जातीय संघर्षांनी जर्जर झालेल्या या प्रदेशासाठी शांती आणि ऐक्याचे प्रतीक मानली जात आहे.
९१ वर्षीय मुइवा हे दीमापूरहून हेलिकॉप्टरने प्रवास करून उखरूलजवळील हंगपुंगच्या बक्षी मैदानावर एका विशाल जनसभेला संबोधित केले ते आता आठवडाभरासाठी आपल्या सोमदल गावात मुक्काम करतील. थुइंगालेंग मुइवा यांनी नागा स्वातंत्र्यासाठी चार दशके जंगलात राहून सशस्त्र लढा दिला. १ ऑगस्ट १९९७ रोजी झालेल्या युद्धविरामानंतर त्यांनी केंद्र सरकारसोबत शांतता चर्चेचा धागा पकडला.
२०१५ मध्ये त्यांनी 'फ्रेमवर्क अॅग्रिमेंट'वर स्वाक्षरी केली. ज्याला शांतता प्रक्रियेत एक ऐतिहासिक टप्पा मानले गेले. मात्र, अंतिम करार अद्याप प्रलंबित आहे. सध्या ते नागालँडच्या दीमापूर येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मणिपूर भेटीच्या बातमीने स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
२०१० मध्ये प्रवेश नाकारला होता
२०१० मध्ये मुइवा यांनी आपल्या गावाला भेट देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांच्या काँग्रेस सरकारने त्यांना मणिपूरमध्ये प्रवेशबंदी घातली होती. त्यानंतर राज्यात मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आणि ६० दिवसांहून अधिक काळ आर्थिक नाकेबंदी सुरू होती. याउलट यावेळी कुकी, जोमी आणि मैतेयी समाजातील अनेक संघटनांनी त्यांच्या प्रवासाचे स्वागत केले आहे.
कडक सुरक्षा व नियंत्रण
मुइवा यांच्या 'घरवापसी' दरम्यान सुरक्षा यंत्रणांनी विशेष सतर्कता बाळगली आहे. उखरूल आणि परिसरात खासगी ड्रोनच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून फक्त अधिकृत परवानगीधारक ड्रोनना परवानगी देण्यात येईल. संपूर्ण कार्यक्रमाचे थेट निरीक्षण केले जाणार आहे.
तांगखुल समुदायाच्या तांगखुल कटमनाओ सकलोंग (TKS) या प्रमुख विद्यार्थी संघटनेने २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून सर्वजण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनू शकतील.
थुइंगालेंग मुइवा यांची ही परतीची यात्रा फक्त एका व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण नागा जनतेच्या सांस्कृतिक एकात्मतेची आणि शांततेच्या आशेची नवी सुरुवात ठरत आहे.