कोव्हॅक्सिनवरून सुरू झालेल्या राजकारणामुळे भारत बायोटेकचे प्रमुख संतापले, नेतेमंडळींना खडेबोल सुनावले

By बाळकृष्ण परब | Updated: January 4, 2021 18:12 IST2021-01-04T18:11:27+5:302021-01-04T18:12:40+5:30

Corona vaccine Update : कोव्हॅक्सिनला मिळालेल्या मान्यतेवरून राजकारणालाही सुरुवात झाली आहे. या प्रकाराबाबत भारत बायोटेकचे प्रमुख कृष्णा एल्ला यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

none of my family members is associated with any political party - Krishna Ella | कोव्हॅक्सिनवरून सुरू झालेल्या राजकारणामुळे भारत बायोटेकचे प्रमुख संतापले, नेतेमंडळींना खडेबोल सुनावले

कोव्हॅक्सिनवरून सुरू झालेल्या राजकारणामुळे भारत बायोटेकचे प्रमुख संतापले, नेतेमंडळींना खडेबोल सुनावले

ठळक मुद्देकोव्हॅक्सिनचा मुद्दा आता राजकीय झाला आहे. त्यामुळे मी यावर माझं स्पष्ट मत नोंदवू इच्छितोमाझ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा राजकीय पक्षाशी संबंध नाहीआम्ही केवळ भारतातच वैद्यकीय चाचण्या घेतलेल्या नाहीत तर आम्ही यूके सह एकूण १२ देशांमध्ये वैद्यकीय चाचण्या घेतल्या आहेत

हैदराबाद - कोरोनाविरोधातील स्वदेशी लस असे कौतुक झालेल्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीला शनिवारी मान्यता मिळाली आहे. मात्र कोव्हॅक्सिनला मिळालेल्या मान्यतेवरून राजकारणालाही सुरुवात झाली आहे. या प्रकाराबाबत भारत बायोटेकचे प्रमुख कृष्णा एल्ला यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माझा आणि माझ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा राजकारणाशी संबंध नाही आहे, असे कृष्णा एल्ला यांनी स्पष्ट केले आहे.

ते म्हणाले की, कोव्हॅक्सिनचा मुद्दा आता राजकीय झाला आहे. त्यामुळे मी यावर माझं स्पष्ट मत नोंदवू इच्छितो. माझ्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचा राजकीय पक्षाशी संबंध नाही. काल कोव्हॅक्सिनला मान्यता देण्याची घोषणा डीजीसीएकडून झाल्यानंतर काँग्रेसचे नेते शशी थरूर, तसेच जयराम रमेश यांनी या मान्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अन्य काही लोकांनीही याबाबतच्या निर्णयावर शंका घेतली होती.



कोव्हॅक्सिनच्या चाचण्यांबाबतची माहिती जाहीर करताना कृष्णा एल्ला यांनी सांगितले की, आम्ही केवळ भारतातच वैद्यकीय चाचण्या घेतलेल्या नाहीत तर आम्ही यूके सह एकूण १२ देशांमध्ये वैद्यकीय चाचण्या घेतल्या आहेत. आम्ही पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि इतर देशांमध्येही चाचण्या घेत आहोत. भारत बायोटेक ही केवळ भारतीय कंपनी नाही तर ती जागतिक कंपनी आहे.

आता अनेकजण आम्ही पुरेशी माहिती देत नसल्याचा तसेच माहितीमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप करत आहेत. माझ्यामते अशा मंडळींनी इंटरनेटवर शोध घेऊन विविध आंतरराष्ट्रीय पत्रकांमध्ये प्रसिद्ध झालेली माहिती वाचावी. या लसीवर सुमारे ७० हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. असे भारत बायोटेकचे प्रमुख कृष्णा एल्ला यांनी सांगितले आहे.



कोव्हॅक्सिन ही कोरोनावरील लस आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांनी संयुक्तरीत्या विकसित केली आहे. या लसीमुळे भारत हा कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांच्या यादीत सामील झाला आहे. मात्र कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे लसीबाबतची अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झाली नसताना कोव्हॅक्सिन या लसीला कशी काय मान्यता देण्यात आली. असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Web Title: none of my family members is associated with any political party - Krishna Ella

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.