उत्तर प्रदेशातील नोएडा येथील सेक्टर ३१ येथील एका खासगी शाळेत संशयास्पद परिस्थितीत सहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. एकुलत्या एका मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तनिष्का असं या विद्यार्थिनीचं नाव असून तिची आई तृप्ती हिने आधीच नवरा गमावला होता, आता मुलीचाही मृत्यू झाल्याने पुढे काय करावं हे तिला समजत नसल्याचं म्हटलं आहे.
दोन वर्षांपूर्वी पतीच्या मृत्यूनंतर मुलगी तनिष्काच तृप्तीसाठी सर्वकाही होती. पण शिक्षक दिनी तनिष्का शाळेत खेळत असताना बेशुद्ध पडली. शाळेतील शिक्षकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तनिष्काच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात या असा फोन आला. कुटुंबीय पोहोचले तेव्हा तनिष्काचा मृ्यू झाला होता, मृतदेह आधीच स्ट्रेचरवर पडून होता. काय झालं ते समजलं नाही.
मुलीला वेळेवर रुग्णालयात नेण्यात आलं का?
तनिष्का सकाळी पूर्णपणे ठीक होती. ती शिक्षकांसाठी भेटवस्तू घेऊन घरातून निघाली होती. मग अचानक असं काय घडलं ज्यामुळे तिचा मृत्यू झाला? पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण स्पष्टपणे सांगितलेलं नाही. आईला शाळेत नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायचं आहे. यामध्ये काही निष्काळजीपणा होता का? आपल्या मुलीला वेळेवर रुग्णालयात नेण्यात आलं होतं का? त्यावेळचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पाहायला मिळावं अशी आईची मागणी आहे.
"माझी मुलगी कधी आणि कुठे बेशुद्ध पडली?"
कुटुंबाने शाळेवर निष्काळजीपणाचा आरोप करत नोएडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे आणि चौकशीची मागणी केली आहे. आईने तक्रारीत असंही म्हटलं आहे की तिची मुलगी कधी आणि कुठे बेशुद्ध पडली याची चौकशी करावी. शाळेने सांगितलं की, त्यांनी मुलाला अस्वस्थ वाटताच रुग्णालयात नेलं. आम्ही पोलीस आणि आई दोघांनाही सहकार्य करत आहोत.
""मला न्याय हवा आहे"
शाळेच्या मुख्याध्यापिका मानवता शारदा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आई सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी आली तेव्हा पोलिसांनी आधीच रेकॉर्डिंग घेतलं होतं. पोलिसांनी त्यावेळी तनिष्काभोवती असलेल्या सर्वांचे जबाब नोंदवले आहेत. "मला न्याय हवा आहे. माझी मुलगी फुलासारखी होती. मी तिला परीसारखं वाढवलं" असं तनिष्काची आई म्हणत आहे.