पाळीव कुत्र्यांकडून झालेल्या हल्ल्याच्या घटना तुम्ही बघितल्या असतील. अशीच एक घटना ग्रेटर नोएडामध्ये घडली आहे. इको व्हिलेज १ सोसायटीच्या परिसरात महिला वॉक करत होती. त्याचवेळी समोरून एक महिला कुत्र्याला घेऊन फिरत होती. कुत्र्याने समोरून येणाऱ्या महिलेला बघितले आणि अंगावर धावून गेला. घाबरलेल्या महिलेने पाठीमागे जाण्याचा प्रयत्न केला, पण तोल गेला आणि ती खाली कोसळली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून, मणक्याचं हाड मोडले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कुत्रा हल्ला करण्याच्या तयारीत असताना महिलेने पोडियम मजल्यावरून खाली पडली. १० ते १२ फूट उंचीवरून महिला जोरात आपटली. यात मणक्याचे हाड आणि इतरही अवयव मोडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महिलेवर कुत्र्याचा हल्ला, काय घडलं?
ईको व्हिलेज १ सोसायटीमध्ये राहणाऱ्या रंजना सूरी भारद्वाज आणि मनिष कुमार यांनी सांगितले की, ही घटना सोमवारी (५ एप्रिल) के-२ टॉवरजवळ घडली.
एक महिला तोंडाला मजल (श्वानाचा मास्क)न घालता तिच्या पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन आली. त्याचवेळी एन-२ टॉवर जवळील पोडियम पार्ककडून एक महिला जात होती.
महिलेला बघून कुत्रा सावध झाला आणि तिच्या दिशेने धावण्याचा प्रयत्न करू लागला. कुत्र्याने जोरात झटका दिला त्यामुळे महिलेने पकडलेल्या बेल्ट सुटला. कुत्रा महिलेवर झडप मारण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळे घाबरलेली महिला पाठीमागे गेली. पण, त्याचवेळी तिचा तोल गेला आणि जवळपास १० ते १२ फूट खाली पडली.
डॉक्टर काय म्हणाले?
महिलेचा किंकाळ्या ऐकून परिसरातील लोक धावून आले. परिसरातील सुरक्षा रक्षकही जमा झाले. त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महिलेच्या मणक्याचे हाड मोडल्याचे सांगितले. त्याचबरोबर पायाच्या हाडालाही दुखापत झाली असल्याचे सांगितले. महिला गंभीर जखमी असल्याने दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले.
जखमी झालेली महिला एस-२ टॉवरमध्ये राहते. तिला दोन मुले असून, एक सहा वर्षांचा आहे, तर दुसरा मुलगा फक्त चार महिन्यांचा आहे.
कुत्र्याच्या मालकावर कारवाईची मागणी
सोसायटीतील रहिवाशांनी कुत्र्याच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ज्यात संपूर्ण घटना कैद झाली आहे. सीसीटीव्ही आणि साक्षीदारांच्या आधारावर पोलीस कुत्र्याच्या मालकावर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.