२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 17:28 IST2025-10-18T17:27:57+5:302025-10-18T17:28:33+5:30
Karnataka News: कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पाणीपुरवठा कऱणाऱ्या एका कर्मचाऱ्याने बरेच महिने पगार न मिळाल्याने आणि अधिकाऱ्यांकडून छळ होत असल्याने वैतागून जीवन संपवले. जीवन संपवणाऱ्या या कर्मचाऱ्याचं नाव चिक्कोसा नायक असं आहे.

२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन
कर्नाटकमधील चामराजनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पाणीपुरवठा कऱणाऱ्या एका कर्मचाऱ्याने बरेच महिने पगार न मिळाल्याने आणि अधिकाऱ्यांकडून छळ होत असल्याने वैतागून जीवन संपवले. जीवन संपवणाऱ्या या कर्मचाऱ्याचं नाव चिक्कोसा नायक असं आहे. तो २०१६ पासून होंगनूर ग्रामपंचायतीमध्ये वॉटरमॅन म्हणून काम करत होता.
जीवन संपवण्यापूर्वी चिक्कोसा नायक या कर्मचाऱ्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामधून त्याने काही गंभीर आरोप केले आहेत. मी २०१६ पासून पाणी पुरवठा करण्याचं काम करत आहे. मला गेल्या २७ महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही. अनेकदा पंचायत विकास अधिकारी आणि ग्रामपंचायत अध्यक्षांना याबाबत विनवणी केली. मात्र कुणीही माझ्या विनंतीकडे लक्ष दिलं नाही. मी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडेही याबाबत तक्रार केली. मात्र त्यावर काही कारवाई झाली नाही, असा आरोप चिक्कोसा नायक यांनी त्यांच्या पत्रातून केला.
त्यांनी पुढे लिहिले की, जर मी सुट्टी मागितली तर बदली कामगाराची व्यवस्था कर, असे सांगितले जायचे. मला सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळात ऑफिसमध्ये राहावे लागे. मी पीडीओ आणि मोहन कुमार यांनी दिलेल्या त्रासाला वैतागून जीवन संपवत आहे. दरम्यान, चिक्कोसा नायक यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याती मागणीही या शेवटच्या चिठ्ठीमधून केली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी पीडीओ, ग्रामपंचायत अध्यक्ष आणि त्यांच्या पतीविरोधात एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सीईओंनी पंचायत विकास अधिकारी रामे गौडा यांना हलगर्जीपणा आणि सेवेतील नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी निलंबित केलं आहे.
दरम्यान, भाजपाने या प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारचा नाकर्तेपणा आणि कर्जात बुडालेल्या स्थितीमुळे कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांचं वेतन मिळत नाही आहे, असा दावा भाजपाने केला आहे.