शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाहीच! ‘एमओसी’ स्थगित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 10:12 IST2025-10-02T10:11:59+5:302025-10-02T10:12:52+5:30
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती उद्योगपती राज कुंद्रा यांना थायलंडमधील फुकेत येथे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नियोजित कुटुंबीय सहलीसाठी जाण्यास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.

शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाहीच! ‘एमओसी’ स्थगित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती उद्योगपती राज कुंद्रा यांना थायलंडमधील फुकेत येथे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नियोजित कुटुंबीय सहलीसाठी जाण्यास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या लुक आऊट सर्क्युलरला (एमओसी) स्थगिती देण्याची मागणी दोघांनी न्यायालयात केली होती.
६० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाशी संबंधित ईओडब्ल्यू तपास करत आहे. या पार्श्वभूमीवर शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आले आहे. मुख्य न्या. श्री चंद्रशेखर व न्या, गौतम अंखड यांच्या खंडपीठाने कुंद्राच्या याचिकेवर राज्य सरकारला ८ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकेनुसार , फुकेत सहलीसाठी हॉटेल व प्रवासाची बुकिंग कुंद्रा यांनी केली आहे. तसेच त्यांच्या पुढील आंतरराष्ट्रीय प्रवास योजला असून २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान लॉस एंजिल्स येथे व्यावसायिक दौरा, २५ ते २६ ऑक्टोबरदरम्यान मालदीव, कोलंबो येथे व्यवसाय दौरा, २० डिसेंबर ते ६ जानेवारी २०२६ दरम्यान लंडन, दुबईत पालकांना भेटायला जाणार असल्याची माहिती दिली होती.
६०.४ कोटींच्या कर्जफेडीत फसवणुकीचा आरोप
ही कारवाई दीपक कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर आधारित आहे. कोठारी हे लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. या नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनीचे संचालक असून, त्यांनी कुंद्रा-शेट्टी दाम्पत्यावर ६०.४ कोटी रुपयांच्या कर्जफेडीतील फसवणुकीचा आरोप केला आहे.
तक्रारीनुसार २०१५ मध्ये जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत कुंद्रा व शेट्टी यांनी स्वत:ला ‘बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे संचालक असल्याचे सांगून व्यवसायासाठी मोठ्या गुंतवणुकीचे आश्वासन दिले. परंतु, मिळालेली रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरण्यात आली. कोरोनाकाळात परतफेड न झाल्याने कोठारी यांनी शेवटी पोलिसांत गुन्हा नोंदवला.
परदेश प्रवासाला नकार
कुंद्रा तपास यंत्रणेला सहकार्य करत असून मागील महिन्यात हजेरी लावली होती. त्याशिवाय २०२१ मध्ये एका प्रकरणात गुन्हा दाखल असतानाही हे दाम्पत्य परदेश दौऱ्यावर गेले होते व सर्व अटींचे पालन करून परतले होते, अशी माहिती कुंद्रा यांच्या वकिलांनी न्यायालयाला दिली. मात्र, न्यायालयाने परदेश प्रवासाला परवानगी नाकारली.