मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 06:23 IST2025-08-25T06:22:24+5:302025-08-25T06:23:30+5:30
Kerala HIgh Court: देवस्वोम मंडळांच्या अखत्यारित असलेल्या मंदिरांचा परिसर राजकीय कार्यक्रम किंवा उपक्रमांसाठी वापरला जात नाही ना याची खातरजमा करावी, असे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने राज्यातील तीन प्रमुख देवस्वोम मंडळांना नुकतेच दिले आहेत.

मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
कोची - देवस्वोम मंडळांच्या अखत्यारित असलेल्या मंदिरांचा परिसर राजकीय कार्यक्रम किंवा उपक्रमांसाठी वापरला जात नाही ना याची खातरजमा करावी, असे निर्देश केरळउच्च न्यायालयाने राज्यातील तीन प्रमुख देवस्वोम मंडळांना नुकतेच दिले आहेत.
त्रावणकोर, कोचिन आणि मालाबार देवस्वोम मंडळांसाठी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. न्या. राजा विजयराघवन आणि न्या. के. व्ही. जयकुमार यांनी एर्नाकुलम येथील एन. प्रकाश यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हे निर्देश दिले आहेत.
एन. प्रकाश यांनी याबाबत दाखल केलेल्या याचिकेत कोझीकोडमधील ताली शिवमंदिर, अट्टिंगलमधील श्री इंडिलायप्पन मंदिर आणि कोलाम येथील कडक्कल देवी मंदिरांचा वापर राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी करण्यात आला होता, असा आरोप केला आहे.
याचिकेत दिले हे दाखले
मंदिर परिसरात राजकीय कार्यक्रमांना विरोध करताना याचिकाकर्त्यांनी काही दाखले दिले होते. श्री इंडिलायप्पन मंदिरात उत्सवादरम्यान गायिका आलोशीने राजकीय गाणी म्हटल्याचे तसेच राजकीय नाट्य सादर करण्यात आल्याचे याचिकेत नमूद आहे.
घोषणाबाजीला आक्षेप
तालीमाता मंदिर परिसरात विवाह समारंभात कैलास मंडपममध्ये ‘एसएफआय जिंदाबाद’ अशी घोषणा देण्यात आली होती, असा दाखला याचिकेत देण्यात आला आहे.