'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 19:55 IST2025-10-16T19:53:13+5:302025-10-16T19:55:11+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यास सहमती दिल्याचा दावा केला होता.

'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा तोंडघशी पडले. ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदी आणि भारताच्या भूमिकेबद्दल एक दावा केला होता. हा दावा भारताने फेटाळून लावला आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी ट्रम्प यांच्या विधानावर सविस्तर उत्तर दिले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत भारताची भूमिका मांडली. डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला होता की, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत माझी फोनवरून चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करेल, असे आश्वासन दिले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणदीप जायसवाल म्हणाले, 'माझ्या माहितीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही.'
रशियाकडून भारत करत असलेल्या तेल खरेदीबद्दल जायसवाल म्हणाले, "भारत मोठ्या प्रमाणात तेल आणि गॅस आयात करतो. सातत्याने बदलत असलेल्या भू राजकीय समीकरणातही भारतीय ग्राहकांच्या हिताची काळजी घेणे यालाच आमचा प्राधान्यक्रम आहे."
"तेलाचे दर स्थिर ठेवणे आणि त्याचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहील याची काळजी घेणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे. राहिला प्रश्न अमेरिकाचा तर आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून ऊर्जा खरेदी करत आहोत. त्याचा विस्तार करत आहोत. गेल्या एका दशकामध्ये यात सातत्याने प्रगती झाली आहे", असे उत्तर त्यांनी दिले.
"अमेरिकेच्या सध्याच्या प्रशासनाने (ट्रम्प प्रशासन)भारतासोबत ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे. आणि त्यादिशेने यावर चर्चाही सुरू आहे", असेही रणधीर जायसवाल म्हणाले.