जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 05:42 IST2025-07-21T05:41:55+5:302025-07-21T05:42:07+5:30
जगातील कोणतीही शक्ती भारताला आदेश देऊ शकत नाही, अशा शब्दांत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले दावे खोडून काढले.

जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
नवी दिल्ली : जगातील कोणतीही शक्ती भारताला आदेश देऊ शकत नाही, अशा शब्दांत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले दावे खोडून काढले. भारत एक सार्वभौम देश असून, स्वत:चे निर्णय स्वत: घेतो. इथे कुणी आदेश देण्याची गरज नाही, असेही धनखड यांनी बजावले.
संरक्षण संपदा सेवेच्या प्रशिक्षकांशी बोलताना धनखड यांनी क्रिकेटचे उदाहरण दिले. ते म्हणाले, प्रत्येक वाईट चेंडू खेळण्याची गरज नाही. जो चांगल्या धावा जमवतो तो नेहमी वाईट चेंडू सोडून देतो. जो हे चेंडू खेळतो त्याला टिपायला विकेटकिपर, ‘गली’मध्ये कुणीतरी असतेच.
वक्तव्यामागे हे आहे कारण
भारत-पाक संघर्षात १० मे रोजी युद्धबंदी झाल्याचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प घेऊ पाहत आहेत. ते सातत्याने आपण युद्ध थांबविल्याचे सांगत आहेत. तर, दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) झालेल्या चर्चेनंतरच युद्धबंदीचा निर्णय झाला असल्याचे भारताने वारंवार बजावले आहे. मात्र तरीही ट्रम्प हे मीच युद्ध थांबवले असे विधान करत आहेत.