"पत्रकार परिषदेला घाबरणारी व्यक्ती..."; पॉडकास्टवरून काँग्रेसने PM मोदींवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 10:07 IST2025-03-17T10:02:20+5:302025-03-17T10:07:20+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पॉडकास्टवरुन काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी टीका केली.

No limit to hypocrisy Congress targeted PM Narendra Modi over podcast | "पत्रकार परिषदेला घाबरणारी व्यक्ती..."; पॉडकास्टवरून काँग्रेसने PM मोदींवर साधला निशाणा

"पत्रकार परिषदेला घाबरणारी व्यक्ती..."; पॉडकास्टवरून काँग्रेसने PM मोदींवर साधला निशाणा

Jairam Ramesh on PM Modi Podcast: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्या यूट्यूब चॅनलवर पॉडकास्टसाठी मुलाखत दिली. तीन तास १७ मिनिटांच्या या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांच्या जीवनाव्यतिरिक्त आरएसएस आणि हिंदु राष्ट्र, महात्मा गांधींसह इतर अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. यावरुनच काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ढोंगीपणाची कोणतीही मर्यादा नसते अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे.

अमेरिकन पॉडकास्टर आणि संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रीडमन यांच्यासोबत तीन तास चाललेल्या या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मुद्द्यांवर मोकळेपणाने भाष्य केलं आणि विविध पैलूंवर चर्चा केली. यावरुनच काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ताशेरे ओढले. पंतप्रधान मोदींनी कधीही पत्रकार परिषद घेतली नाही पण त्यांना अमेरिकन पॉडकास्टरसमोर बसणे सोयीचे वाटते, असं जयराम रमेश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींवर त्यांच्या सरकारला जबाबदार धरणाऱ्या संस्था नष्ट केल्याचा आरोप केला. पंतप्रधान मोदींची टीकाकारांविरुद्ध सूडबुद्धीने वागतात, असंही जयराम रमेश म्हणाले. "पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना सामोरे जाण्यास घाबरणारी व्यक्ती परदेशी पॉडकास्टरसमोर आरामात बसते. टीका सहन करणं हा लोकशाहीचा आत्मा आहे असे सांगण्याचे धाडस पंतप्रधान मोदी यांच्याकडे आहे, मात्र आपल्या सरकारला जबाबदार धरणारी प्रत्येक संस्था त्यांनी उद्ध्वस्त केली आहे. इतिहासात असं कोणतेच उदाहरण नाही ज्यात अशा सूडभावनेने त्यांच्या टीकाकारांच्या मागे लागतात. ढोंगीपणाला कोणतीही सीमा नाही," असं जयराम रमेश यांनी म्हटलं.

दरम्यान, अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानशी संबंध तसेच चीन, अमेरिका आणि रशिया-युक्रेन युद्धावर आपले मत व्यक्त केले. गोध्रा प्रकरणाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, गोध्रा दंगलीबाबत खोट्या कथा रचल्या गेल्या, मात्र न्यायालयाने आम्हाला निर्दोष ठरवले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं. ते त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पूर्वीपेक्षा जास्त तयार दिसत आहेत, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
 

Web Title: No limit to hypocrisy Congress targeted PM Narendra Modi over podcast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.