नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेलं भाषण अतिशय उथळ होतं. त्यात काहीही नवं नव्हतं, अशा शब्दांमध्ये काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींच्या कार्यकाळात अच्छे दिन आले नाहीत, आता जनतेला सच्चे दिन हवे आहेत, असा टोला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरील भाषण अतिशय उथळ होतं. त्यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नव्हतं, असं सुरजेवाला पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. मोदींच्या भ्रष्टाचाराबद्दलच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'राफेल विमान खरेदी प्रकरण असो वा व्यापम घोटाळा किंवा छत्तीसगडमधील पीएएस घोटाळा, मोदी एकाही विषयावर बोलले नाहीत,' असं सुरजेवाला 'यांनी म्हटलं. डोकलाममधील चीनच्या घुसखोरीबद्दलदेखील मोदी मूग गिळून गप्प बसतात. देशामध्ये द्वेष पसरवणाऱ्या घटना घडत असतानाही मोदी गप्पच राहतात,' अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदींवर तोफ डागली.
'अच्छे दिन' आले नाहीत, आता देशाला 'सच्चे दिन' हवेत; काँग्रेसचा मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 21:24 IST