दहशतवादी संघटनांमधील काश्मिरींची भरती थांबली, मात्र पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 22:49 IST2019-09-11T22:49:41+5:302019-09-11T22:49:56+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आल्यापासून तणावपूर्ण शांतता आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती आता निवळत आहे.

दहशतवादी संघटनांमधील काश्मिरींची भरती थांबली, मात्र पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आल्यापासून तणावपूर्ण शांतता आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती आता निवळत आहे. तसेच गेल्या काही दिवसांत दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक तरुण भरती झाल्याचे समोर आलेले नाही. असे जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले. काही ठिकाणी दहशतवाद्यांकडून फळविक्रेत्यांना धमकावण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र पोलिसांना परिस्थितीची माहिती असून, सर्वसामान्यांमध्ये कुणी दहशत पसरवू नये यासाठी आम्ही खबरदारी घेत आहोत.
दिलबाग सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, दहशतवादी संघटनांमध्ये स्थानिक तरुण भरती झाल्याची कुठलीही नवी माहिती समोर आलेली नाही. भूतकाळात काही युवकांना भ्रमित करून त्यांना चुकीच्या मार्ग दाखवला गेला. मात्र त्यापैकी काही जणांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात परत आणण्यात आम्हाला यश मिळाले आहे. काही ठिकाणी घुसखोरी झाल्याचे वृत्त आहे. गेल्या महिन्यात गुलमर्ग विभागात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले होते.''
दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीबाबत दिलबाग सिंह यांनी सांगितले की,''काश्मीर खोऱ्यात आता परिस्थिती हळुहळू पूर्वपदावर येत आहे. विद्यार्थी शाळेत जात आहेत. तसेच कर्मचारी कार्यालयांमध्ये जात आहेत. मात्र दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी फळविक्रेत्यांना धमकावल्याच्या घटना घडल्या आहेत.''