नितीश कुमारांचा मुलगा निशांत राजकारणात येणार? अचानक रंगलेल्या चर्चांमागे खरं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 09:44 AM2024-06-19T09:44:59+5:302024-06-19T09:46:04+5:30

Nitish Kumar Son Nishant in Bihar Politics: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एकुलता एक मुलगा निशांत याचा सध्या तरी राजकारणाशी अजिबात संबंध नाही. पण तो लवकरच राजकारणात प्रवेश करू शकतो, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Nitish Kumar son Nishant Kumar to enter political field in Bihar Politics as JDU leaders demand | नितीश कुमारांचा मुलगा निशांत राजकारणात येणार? अचानक रंगलेल्या चर्चांमागे खरं कारण काय?

नितीश कुमारांचा मुलगा निशांत राजकारणात येणार? अचानक रंगलेल्या चर्चांमागे खरं कारण काय?

Nitish Kumar Son Nishant in Bihar Politics: राजकारणात घराणेशाही हा मुद्दा कोणासाठीही नवीन नाही. अनेक घरातून तीन-चार पिढ्या राजकारणात कार्यरत असतात. पण देशात अजूनही असे काही नेते आहेत, ज्यांच्या कुटुंबातून राजकारणात कोणीही सक्रिय नाही. या नेत्यांमध्ये बिहारच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एकुलता एक मुलगा निशांत याचा राजकारणाशी अजिबात संबंध नाही. तो सार्वजनिक ठिकाणी फारसा दिसतही नाही. मात्र, आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एकुलता एक मुलगा लवकरच राजकारणात प्रवेश करू शकतो, अशी चर्चा सुरु झाली आहे.

निशांतला राजकारणात आणण्यामागचे खरे कारण काय?

मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार हा वडिलांसोबत सार्वजनिक ठिकाणी फार कमी वेळा दिसतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जनता दल युनायटेडचे ​​(जेडीयू) नेते आणि कार्यकर्ते निशांतचा पक्षात समावेश करण्यासाठी नितीश कुमार यांच्यावर दबाव आणत असल्याची चर्चा आहे. नितीशही या प्रकरणी संमती दर्शवू शकतात असे बोलले जात आहे. यामागचे कारण म्हणजे पक्षाकडे नितीश यांच्या राजीनाम्यानंतर त्यांची जागा भरून काढणारे दुसऱ्या फळीतील नेतृत्व नाही. २९ जून रोजी दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून या बैठकीत निशांतबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चर्चांना उधाण का आले?

सोमवारी जेडीयू नेते आणि राज्य अन्न आयोगाचे प्रमुख विद्यानंद विकल यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे या चर्चांना उधाण आले. "बिहारमधील नव्या राजकीय परिस्थितीत राज्याला तरुण नेतृत्वाची गरज आहे. निशांत कुमार यांच्यात आवश्यक ते सर्व गुण आहेत. जनता दल युनायटेडच्या अनेक सहकाऱ्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे की निशांत यांनी पुढाकार घेऊन राजकारणात सक्रिय व्हावे," असे ट्विट विकल यांनी केले होते. तर जेडीयूचे प्रदेश सरचिटणीस रणधीर सिंह यांनीदेखील याआधीच अशी मागणी केली होती.

नितीश यांचे निकटवर्तीय काय म्हणतात?

एकीकडे निशांत यांना पक्षात सक्रीय करण्याबाबत चर्चा असताना दुसरीकडे जनता दल युनायटेडचे ​​माजी प्रदेशाध्यक्ष आणि नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील विश्वासू विजय कुमार चौधरी यांनी मात्र निशांत यांच्याबाबतच्या चर्चा पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे. अशा विषयावर सार्वजनिक चर्चा करू नका, असे आवाहनही त्यांनी पक्षातील इतर नेतेमंडळींना केले आहे.

Web Title: Nitish Kumar son Nishant Kumar to enter political field in Bihar Politics as JDU leaders demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.