नितीश कुमारांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 11:35 AM2017-07-28T11:35:27+5:302017-07-28T13:16:48+5:30

बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणा-या नितीश कुमार यांनी शुक्रवारी बिहार विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला 

Nitish Kumar presents for Assembly Floor Test | नितीश कुमारांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

नितीश कुमारांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

Next
ठळक मुद्देनितीश कुमार यांनी बिहार विधानसभेत बहुमताचा प्रस्ताव सादर केलातेजस्वी यादव यांची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणा करण्यात आली आहेएनडीएच्या सहाय्याने नितीश कुमार यांनी बहुमताचा 122 हा आकडा गाठला असल्याचा दावासहा महिन्यांच्या तयारीनंतर हे सर्व करण्यात आलं असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे

पाटणा, दि. 28 - सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणा-या नितीश कुमार यांनी शुक्रवारी बिहार विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी नितीश कुमार यांना 122 मतांची आवश्यकता होती. त्यांना 131 मते मिळाली तर, विरोधात असलेल्या राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस  आघाडीच्या बाजूने 108 मते पडली.  विश्वासदर्शक ठरावाआधी विधानसभेत प्रचंड गोंधळ सुरु झाला .  तेजस्वी यादव यांच्या नावाची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणा करण्यात आली.

यावेळी तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांवर हल्लाबोल करत माझ्या आत्मविश्वासाला नितीश कुमार घाबरले असा टोला लगावला आहे. जेडीयू आमदारांनी मात्र आपण सहजपणे बहुमत सिद्ध करु असं सांगितलं आहे. एनडीएकडून बुधवारी राज्यापालांना 132 आमदारांची यादी सोपवण्यात आली. यामध्ये जेडीयूचे 71, भाजपाचे 53, आरएलएसपीचे दोन, एलजेपीचे 2 आणि तीन अपक्ष आमदारांचा समावेश होता. 

'बिहारमधील लोकांना खूप सहन करावं लागलं आहे. आमच्याकडे 80 आमदार आहेत. मला हटवू शकत नाही हे नितीश कुमार यांना चांगलंच माहित होतं. हे सर्व सहा महिन्यांच्या तयारीनंतर करण्यात आलं आहे', असं तेजस्वी यादव बोलले आहेत.

दुसरीकडे पाटणा उच्च न्यायालयात नितीश कुमार यांच्या जेडीयूने भाजपासोबत हातमिळवणी करत केलेल्या सरकार स्थापनेविरोधात आरजेडीकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. सोमवारी याचिकेवरील सुनावणी होणार आहे.


भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले नितीश कुमार आज विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करून ती परीक्षा सहजपणे उत्तीर्ण होतील याची शक्यता आहे. पण यानिमित्ताने त्यांच्या संयुक्त जनता दलातील फुटीची पटकथाही तयार होताना दिसत आहे. पक्ष टिकविणे हीच खरी नितीश कुमार यांची परीक्षा असणार आहे. सहा वेळा मुख्यमंत्री होण्यासाठी, दरवेळी संगत बदलत जाण्यामुळे विरोधकांनी त्यांच्या विश्वासार्हतेबद्दलच शंका व्यक्त केली आहे.



नितीश सरकार टिकण्यासाठी संयुक्त जनता दलात फूट होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर जदयूच्या नाराज नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे पक्ष टिकविण्यासाठी ते काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ अध्यक्ष व माजी अध्यक्ष शरद यादव यांना नितीशकुमार यांचा भाजपासमवेत जाण्याचा निर्णय अमान्य आहे. खा. अली अन्वर अन्सारी व खा. वीरेंद्र कुमार यांनीही नितीश कुमार यांच्या निर्णयाला उघडपणे विरोध दर्शविला आहे. आम्ही भाजपासोबत जाणार नाही, असे दोघा खासदारांनी जाहीर केले आहे. याखेरीज संयुक्त जनता दलाच्या बिहारमधील मुस्लीम आमदारांनाही भाजपाशी संगत करणे आवडलेले दिसत नाही. त्या पक्षाच्या केरळ शाखेनेही नितीश कुमार यांचा निर्णय आम्हाला अमान्य असल्याचे जाहीर केले आहे. या साºयाचा परिणाम बिहार सरकारवर होऊ नये, यासाठी भाजपातर्फेच जोरात प्रयत्न सुरू आहेत.

नितीश कुमार यांनी भाजपासमवेत सरकार स्थापन करण्याचे ठरविल्यानंतर शरद यादव यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर राहुल गांधी आणि शरद यादव यांच्यात चर्चा झाली. नितीशकुमार यांनी विरोधकांच्या एकजुटीला तडा दिला असला तरी आम्ही विरोधकांसोबत राहू, असे यादव यांनी त्यांना सांगितले होते. नितीशकुमार यांच्या निर्णयाशी सहमत नसलेल्या खासदार, आमदार तसेच अन्य नेत्यांना आता एकत्र आणले जाणार आहे.

शरद यादव यांनी आपल्या निवासस्थानी काही नेत्यांशी चर्चा करुन पुढील रणनिती ठरविली आहे. तिथे अली अनवर अन्सारी, वीरेंद्र कुमार यांच्यासह पक्षाचे अन्य नेतेही हजर होते.

Web Title: Nitish Kumar presents for Assembly Floor Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.