नितीश यांचे मानसिक संतुलन ढासळले, आता खुर्ची सोडा; राबडीदेवी यांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 11:22 IST2025-03-22T11:21:56+5:302025-03-22T11:22:33+5:30

राष्ट्रगीताचा अवमान केल्याने बिहारमध्ये गदारोळ...

Nitish kumar mental balance has deteriorated, now leave the chair; Rabri Devi's attack | नितीश यांचे मानसिक संतुलन ढासळले, आता खुर्ची सोडा; राबडीदेवी यांचा हल्ला

नितीश यांचे मानसिक संतुलन ढासळले, आता खुर्ची सोडा; राबडीदेवी यांचा हल्ला

एसपी सिन्हा / विभाष झा

पाटणा : राष्ट्रगीत सुरू असतानाच हातवारे करणे, इतरांशी बोलणे यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार अडचणीत आले आहेत. त्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या मुद्द्यावरून बिहार विधानसभेत शुक्रवारी प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी सभागृहाच्या आत आणि बाहेर पोस्टर लावून निदर्शने केली. कामकाज सुरू होण्यापूर्वी राजदने नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

तेजस्वी यादव म्हणाले की, ‘बिहारसाठी हा काळा दिवस होता. भारत मातेचा जयघोष करणारे भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री गायब आहेत. गुरुवारी आमच्या सर्वांच्या मान शरमेने खाली गेल्या. भारतीय राजकारणात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची ही पहिलीच घटना आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली असून, त्यांनी देशाची माफी मागावी, असे त्यांनी म्हटले.

खुर्ची सोडा, मुलाला मुख्यमंत्री करा
राष्ट्रगीताच्या अवमानावरून विधान परिषदेतही गदारोळ झाला. राबडीदेवी बोलत असताना त्यांचा माईक बंद झाला. राबडीदेवी म्हणाल्या की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे मानसिक संतुलन ढासळले असेल तर त्यांनी पायउतार व्हावे आणि आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवावे. तुमचा मुलगा यशस्वी झाला नाही तर खुर्ची दुसऱ्याच्या हाती द्या.

भाजप म्हणते, अपमान केला नाही 
भाजप आमदार पवन जैस्वाल म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केलेला नाही. त्यांना काहीतरी आठवले असेल. राष्ट्रगीत लक्षात आले नसेल म्हणून त्यांनी दीपक कुमार यांनी विचारले असेल. पुन्हा ते राष्ट्रगीत म्हणत होते. विरोधकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.

नितीश कुमार यांच्या मुलाच्या लग्नाची जोरदार तयारी
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मुलगा निशांत कुमार यांची होणारी पत्नी प्रशासकीय सेवेतील अधिकारी असल्याचे सांगितले जाते. निशांत यांची पत्नी केंद्रीय मंत्रालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.

त्या मूळच्या बिहारमधील नालंदा येथील रहिवासी आहेत. पाटण्यापासून ते थेट दिल्लीपर्यंत कुटुंबीय निशांत यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. नितीश कुमार यांच्या जवळचे माजी आयएएस दिल्लीतील लग्नाची तयारी पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या निशांत कुमार यांचे वय ५० आहे. 
 

Web Title: Nitish kumar mental balance has deteriorated, now leave the chair; Rabri Devi's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.