हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 00:22 IST2025-12-19T00:21:24+5:302025-12-19T00:22:35+5:30
Nitish Kumar Hijab Controversy: गुप्तचर यंत्रणांनी संकेत दिले की काही समाजकंटक आणि गुन्हेगारी घटक त्यांना हानी पोहोचवू शकतात.

हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
Nitish Kumar Hijab Controversy: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दोन दिवसांपूर्वी आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्रे वाटप करत होते. त्यावेळी त्यांच्यासमोर एक हिजाब घातलेली तरूणी नियुक्तीपत्र घेण्यासाठी हजर झाली. त्यावेळी नितीश कुमार यांनी बोलताबोलता अचानक त्या तरूणीचा हिजाब तोंडावरून खाली खेचला. हा प्रकार घडताच या संदर्भातील व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने समाजमाध्यमांमध्ये पसरला. नितीश कुमार यांनी केलेल्या कृतीबाबत त्यांच्याविषयी टीकेची झोड उठली. अनेकांनी इंटरनेटवरच त्यांना सुनावले. तर काहींनी धर्माशी कनेक्शन लावत, नितीश कुमारांना धमकीही दिल्याचे दिसून आले. या सर्व घडलेल्या घटनेनंतर नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवण्याच निर्णय घेण्यात आला आहे.
हिजाब वादानंतर गुप्तचर संस्थांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेबाबत माहिती मिळाली आहे. त्यामुळे, बिहार पोलिस महासंचालक आणि इतर उच्च अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे आणि सुरक्षा घेरा अधिक कडक शिस्तीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. हिजाब घटनेनंतर काही समाजकंटक आणि गुन्हेगारी घटक नितीश कुमार यांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी पोलिसांना भीती आहे.
दरम्यान नितीश कुमार यांनी मुस्लीम महिला डॉक्टर नुसरत यांच्या चेहऱ्यावरील हिजाब काढण्याचा प्रयत्न केल्याच्या कृतीवरून काहींनी त्यांची पाठराखणही केली. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि जेडीयूचे मंत्री जामा खान यांनी नितीश कुमार यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. गिरीराज सिंह म्हणाले, "(नितीश कुमार यांनी केलेल्या कृतीत) यात काहीही चूक नाही. जर कोणी नियुक्ती पत्र घेण्यासाठी येत असेल, तर त्यांनी आपला चेहरा दाखवण्यास का घाबरावे? मतदानाला जाताना तुम्हाला आपला चेहरा दाखवावा लागत नाही का?" तसेच, नितीश कुमार यांच्याच पक्षाचे मुस्लीम मंत्री जामा खान म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी जी कृती केली, त्याला चूक समजू नका. त्यांनी फक्त एका मुस्लिम मुलीवर मुलीच्या नात्याने प्रेम दाखवले. ज्या मुलीने आयुष्यात यश मिळवले आहे आणि ती डॉक्टर झाली आहे, तिचा चेहरा पाहावा समाजानेही पाहावा अशी त्यांची इच्छा होती."