मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:09 IST2025-12-17T14:09:08+5:302025-12-17T14:09:41+5:30
Nitish Kumar Hijab Controversy : १५ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर नुसरत परवीन यांनी कोलकाता येथील आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका जाहीर कार्यक्रमात महिला डॉक्टर नुसरत परवीन यांचा बुरखा हटवल्याची घटना आता गंभीर वळणावर पोहोचली आहे. या घटनेमुळे डॉक्टर नुसरत यांना मानसिक धक्का बसला असून, त्यांनी बिहार सोडून थेट कोलकाता गाठले आहे. विशेष म्हणजे, ज्या सरकारी नोकरीचे स्वप्न त्यांनी पाहिले होते, ती नोकरी जॉइन करण्यासही त्यांनी सध्या नकार दिला आहे.
१५ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर नुसरत परवीन यांनी कोलकाता येथील आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. "मी शाळा आणि कॉलेजमध्ये नेहमी बुरखा घालूनच शिक्षण घेतले. माझ्यासाठी बुरखा हा केवळ कपडा नसून माझ्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्या दिवशी कार्यक्रमात अनेक लोक उपस्थित होते, काही जण हसत होते. एक मुलगी म्हणून मला ते अपमानास्पद वाटले," असे ती म्हणाली.
नोकरी नाकारली, भविष्यावर टांगती तलवार
नुसरत परवीन हिला २० डिसेंबर रोजी सरकारी नोकरी रुजू करायची होती. मात्र, त्यांना आता भीती वाटत आहे. "मी खूप मेहनतीने इथवर पोहोचले होते. आई-वडिलांना मदत करण्याचे माझे स्वप्न होते, पण आता बिहारला परत जाण्याची हिम्मत माझ्यात उरली नाहीय," असे ती म्हणाली. तिचे कुटुंब तिला समजावण्याचा प्रयत्न करत आहे, पण सध्या ती मानसिक आघातामध्ये आहे. यामुळे ती पुन्हा बिहारला नोकरी सुरु करण्यासाठी जाण्यास तयार नाहीय.
नेमके काय घडले होते?
पाटणा येथे एका नियुक्ती पत्रांच्या वाटप कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंचावर असलेल्या नुसरत परवीन यांच्या डोक्यावरील बुरख्याला हात लावून तो हटवण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्र्यांच्या या कृत्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती, मात्र आता संबंधित पीडित महिला डॉक्टरनेच राज्य सोडल्याने नितीश कुमार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.