'जर दुसरीकडे कुठे हात लावला असता तर...'; नितीश कुमार यांच्या हिजाब वादावर मंत्र्याचे आक्षेपार्ह विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 14:00 IST2025-12-17T13:55:52+5:302025-12-17T14:00:36+5:30
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलेचा हिजाब ओढल्याच्या घटनेने वातावरण चांगलेच तापले आहे.

'जर दुसरीकडे कुठे हात लावला असता तर...'; नितीश कुमार यांच्या हिजाब वादावर मंत्र्याचे आक्षेपार्ह विधान
Nitish Kumar Hijab Act: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात एका मुस्लिम महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याचा प्रकार ताजा असतानाच, उत्तर प्रदेशचे मंत्री संजय निषाद यांनी यावर अत्यंत खालच्या पातळीवर टिप्पणी करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. जर नितीश कुमार यांनी इतर ठिकाणी स्पर्श केला असता तर काय झाले असते? असा सवाल निषाद यांनी केला. या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, संजय निषाद यांनी स्पष्टीकरण देखील दिले. निषाद यांच्या वक्तव्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
नेमकी घटना काय?
सोमवारी बिहारमध्ये नवनियुक्त आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्रे वाटपाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी १० व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले नितीश कुमार एका महिला डॉक्टरला नियुक्तीपत्र देताना अचानक तिचा हिजाब ओढताना दिसले. त्यांच्या शेजारी उभे असलेले उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्नही केला, मात्र तोपर्यंत ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती.
संजय निषाद यांचे 'ते' वादग्रस्त विधान
उत्तर प्रदेशचे मत्स्यव्यवसाय मंत्री संजय निषाद यांनी या घटनेचा बचाव करताना मर्यादा ओलांडली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, "लोकांनी यावर इतका आरडाओरडा करू नये. शेवटी ते (नितीश कुमार) सुद्धा माणूसच आहेत. फक्त नकाबला हात लावला तर एवढा गदारोळ होतोय, जर त्यांनी दुसरीकडे कुठे स्पर्श केला असता तर काय झाले असते?"
निषाद यांचे स्पष्टीकरण
हे विधान करताना निषाद यांच्या चेहऱ्यावर हास्य होते, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. वाढता वाद पाहून संजय निषाद यांनी एका व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते, त्यांच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला गेला. "पूर्वांचलमध्ये अशा प्रकारच्या म्हणी किंवा वाक्प्रचार बोलले जातात, ते समजून घेणे गरजेचे आहे," असे सांगत त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
दंगल फेम अभिनेत्री झायरा वसीमची टीका
झायरा वसीमने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. "स्त्रीची प्रतिष्ठा आणि शालीनता ही खेळण्याची वस्तू नाही. सत्ता तुम्हाला मर्यादा ओलांडण्याचा परवाना देत नाही, असं झायराने म्हटलं. तिने नितीश कुमार यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही केली. समाजवादी पक्षाच्या नेत्या सुमय्या राणा यांनीही लखनऊमध्ये नितीश कुमार आणि संजय निषाद या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली असून कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, नितीश कुमार यांची प्रकृती आणि मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा विरोधकांनी केला असून, ते राज्य चालवण्यास सक्षम नसल्याचे म्हटले आहे.