"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 19:57 IST2025-12-20T19:56:02+5:302025-12-20T19:57:07+5:30
"या संपूर्ण प्रकरणाला 'वाद' म्हणणे हीच मुळात एक दुःखद गोष्ट आहे. कौटुंबिक आणि भावनात्मक नात्यांमधील संवादाला राजकीय रंग देऊ नये."

"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी संबंधित 'नकाब' प्रकरणाला केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी एक वेगळा आणि भावनिक दृष्टिकोन दिला आहे. या प्रकरणाला 'वाद' मानण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला असून, हे नाते वडील आणि मुलीसारखे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'वाद' म्हणणे हीच मुळात एक दुःखद गोष्ट -
राज्यपाल आरिफ मोहम्मद खान शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, "जिथे नाते बाप-लेकीचे असते, तेथे वादाला कोणतीही जागा नसते. या संपूर्ण प्रकरणाला 'वाद' म्हणणे हीच मुळात एक दुःखद गोष्ट आहे. कौटुंबिक आणि भावनात्मक नात्यांमधील संवादाला राजकीय रंग देऊ नये.
देशाच्या कन्येचा सन्मान, ही आपली सामूहिक जबाबदारी -
या प्रकरणातील विद्यार्थिनी नुसरत परवीन हिचा उल्लेख करत राज्यपाल म्हणाले, "नुसरत ही देशाची मुलगी आहे. आपल्या देशाच्या कन्येचा सन्मान करणे आणि त्यांच्या भावनांची काळजी घेणे, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे."
राज्याचे प्रमुख या नात्याने नीतीश कुमार पित्याच्या भूमिकेत -
राज्यपाल खान पुढे म्हणाले, राज्याचे प्रमुख या नात्याने नीतीश कुमार हे एका पित्याच्या भूमिकेत आहेत. "बाप आणि लेकीमध्ये कधीही वाद होऊ शकत नाही. नितीश कुमार हे नुसरतसाठी वडिलांसारखेच आहेत. एका वडिलांचे आपल्या मुलीप्रती असलेले प्रेम आणि त्यांनी लावलेली शिस्त याला वादाची संज्ञा देणे चुकीचे आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.