नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 05:25 IST2025-12-15T05:23:43+5:302025-12-15T05:25:20+5:30
पक्षनेतृत्वाने नितीन यांचा संघटनात्मक अनुभव, स्थानिक पकड आणि प्रशासकीय क्षमता लक्षात घेऊन ही जबाबदारी सोपवली आहे.

नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत रविवारी बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. ही नियुक्ती १४ डिसेंबर २०२५ पासून तत्काळ लागू झाली असून, बिहारसह राष्ट्रीय राजकारणात भाजपची रणनीती अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
या नियुक्तीबाबत भाजपने अधिकृत आदेश जारी केला आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, ही नियुक्ती भाजपच्या संसदीय बोर्डाने केली आहे. नितीन नबीन आता राष्ट्रीय स्तरावर संघटनेची महत्त्वाची जबाबदारी सांभाळतील, असे आदेशात म्हटले आहे.
पक्षनेतृत्वाने नितीन यांचा संघटनात्मक अनुभव, स्थानिक पकड आणि प्रशासकीय क्षमता लक्षात घेऊन ही जबाबदारी सोपवली आहे. याआधी जेपी नड्डा यांनाही राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यापूर्वी कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती; त्यामुळे नबीन यांच्या नियुक्तीकडे मोठ्चा भूमिकेचा संकेत म्हणून पाहिले जात आहे.
"नितीन नबीन यांनी मेहनती कार्यकर्ता अशी ओळख निर्माण केली आहे. ते युवा आणि कष्टाळू नेते असून, त्यांच्याकडे मोठा संघटनात्मक अनुभव आहे. बिहारमध्ये आमदार तसेच मंत्री म्हणून अनेक कार्यकाळासाठी त्यांचा विक्रम आहे. त्यांची ऊर्जा आणि समर्पण पक्षाला अधिक बळकट करेल. त्यांचे अभिनंदन." - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
सध्याची जबाबदारी
नितीन नबीन सध्या बिहारमधील नितीर कुमार सरकारमध्ये रस्ते बांधकाम मंत्री आहेत. ते पाटण्याच्या बांकीपूर मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले आहेत. कायस्थ समाजातून येणारे नबीन हे भाजपचे ज्येष्ठ नेते नवीन किशोर सिन्हा यांचे पुत्र असून, विद्यार्थी राजकारणापासून संघटनेतील विविध पदांपर्यंत त्यांनी प्रदीर्घ प्रवास केला आहे.