Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 18:26 IST2025-12-14T18:23:17+5:302025-12-14T18:26:09+5:30
भारतीय जनता पक्षाने रविवारी (१४ डिसेंबर) एक महत्त्वाची नियुक्ती केली. बिहारमध्ये मंत्री असलेल्या नितीन नबीन यांची पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
नितीन नबीन यांच्यावर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. रविवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले. भाजपच्या या निर्णयाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. जेपी नड्डा यांच्या जागी पक्षाचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल, याची प्रतिक्षा असताना ही नियुक्ती करण्यात आली आहे. या पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू आहे. पण, नितीन नबीन यांच्या नियुक्तीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. पण, अचानक पक्षाची राष्ट्रीय स्तरावरील सूत्रे सोपवण्यात आलेले नितीन नबीन कोण आहेत?
नितीन नबीन हे, सिन्हा कायस्थ समुदायातून येतात. ते मुख्यमंत्री नितीन कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारमध्ये रस्ते निर्माण मंत्री आहेत. नितीन नबीन हे भाजपचे वरिष्ठ नेते नवीन किशोर सिन्हा यांचे पुत्र आहेत. वडिलांच्या निधनानंतर तेच त्यांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. ते बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
कार्यकारी अध्यक्ष बनणारे सर्वात तरुण नेता
नितीन नबीन हे भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनणारे सर्वात तरुण आणि पहिले नेते ठरले आहेत. ते ४५ वर्षांचे आहेत. नितीन नबीन यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून मिळालेली नियुक्ती, तेच पुढचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
नितीन नबीन यांनी पक्षाच्या बांधणीमध्ये प्रत्येक पदावर काम केले आहे. पक्ष बांधण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. युवा मोर्चा, सरकारमध्ये मंत्री ते आता राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. अत्यंत शिस्तप्रिय, रणनीती आणि लोकांशी दांडगा संपर्क असलेला नेता म्हणून त्यांना ओळखले जाते.
छत्तीसगढमध्ये पक्षाच्या विजयात मोठा वाटा
भाजपने छत्तीसगढमध्ये त्यांना प्रभारी बनवले होते. त्यांनी पक्षाने टाकलेली जबाबदारी निभावत बूथ पातळीवर पक्ष मजबूत करण्याचे काम केले. पक्षाची बांधणी आणि विस्तार करण्याबरोबरच त्यांनी निवडणूक रणनीतीवर लक्ष्य केंद्रित केले. याचा परिणाम म्हणजे भाजपला छत्तीसगढमध्ये घवघवीत यश मिळाले. त्यानंतर आता नितीन नबीन यांना थेट पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली आहे.