नितीन गडकरींच्या स्वप्नांना कोण ब्रेक लावतंय? त्यांच्याच महत्वकांशी प्रकल्पांना सर्वाधिक विलंब
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 15:04 IST2022-12-25T15:04:29+5:302022-12-25T15:04:37+5:30
सरकारी रिपोर्टने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नितीन गडकरींच्या स्वप्नांना कोण ब्रेक लावतंय? त्यांच्याच महत्वकांशी प्रकल्पांना सर्वाधिक विलंब
नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 2024 च्या अखेरीस भारतातील रस्ते अमेरिकेसारखे होतील, असा दावा सातत्याने करतात. मात्र, सरकारी अहवालाने त्यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्याच मंत्रालयाचे प्रकल्प सर्वाधिक विलंबाने सुरू असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
पायाभूत सुविधा क्षेत्रात रस्ते वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रातील सर्वाधिक 358 प्रकल्प विलंबित आहेत. सरकारी अहवालानुसार यानंतर रेल्वेचे 111 प्रकल्प आणि पेट्रोलियम क्षेत्रातील 87 प्रकल्प आहेत. अनेक निवडणूक रॅलींमध्ये नितीन गडकरी आपल्या मंत्रालयात निधीची कमतरता नसल्याचे सांगतांना ऐकायला मिळाले. विरोधी पक्षांच्या अनेक मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या या उदारतेचे कौतुक केले. मात्र हा अहवाल त्यांच्या स्वप्नांना ब्रेक लावणार आहे.
नितीन गडकरींचे स्वप्न काय आहे?
नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या दाव्यांमुळे आणि कामामुळे चर्चेत असतात. यावर्षी मार्च महिन्यात त्यांनी संसदेच्या माध्यमातून देशातील जनतेला मोठे वचन दिले होते. डिसेंबर 2024 च्या अखेरीस भारत रस्त्यांच्या बाबतीत अमेरिकेशी बरोबरी करेल, असे ते म्हणाले होते. यानंतर ते सातत्याने हा दावा करत आले आहेत.
रेल्वेतील 111 प्रकल्पांनाही विलंब
रस्ते वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रातील 769 पैकी 358 प्रकल्प उशिराने सुरू आहेत. रेल्वेतील 173 प्रकल्पांपैकी 111 प्रकल्प वेळेच्या मागे धावत आहेत, तर पेट्रोलियम क्षेत्रातील 154 प्रकल्पांपैकी 87 प्रकल्पही उशीरा सुरू होत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय 150 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष ठेवते.