देशात येणार हायपरलूप, फनिक्युलर रेल्वे अन्... परिवहन योजनेची गडकरींनी तयार केली रूपरेषा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 11:48 IST2025-07-07T11:45:25+5:302025-07-07T11:48:46+5:30
गडकरी म्हणाले की, भारतातील वाहतूक क्षेत्र एका मोठ्या बदलातून जात आहे. ११ प्रमुख वाहन उत्पादकांकडून ट्री बँक, मोबाइल-आधारित ड्रायव्हिंग टेस्ट आणि फ्लेक्स-फ्युएल इंजिनसारखे उपक्रम पाइपलाइनमध्ये आहेत.

देशात येणार हायपरलूप, फनिक्युलर रेल्वे अन्... परिवहन योजनेची गडकरींनी तयार केली रूपरेषा
रांची/नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पुढच्या पिढीच्या वाहतुकीसाठी एक महत्त्वाकांक्षी रूपरेषा तयार केली आहे. यामध्ये शहरी भागात इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सपोर्ट, हायपरलूप, तर दुर्गम भागांसाठी रोपवे, केबल बस आणि फनिक्युलर रेल्वेचा समावेश आहे.
गडकरी म्हणाले की, भारतातील वाहतूक क्षेत्र एका मोठ्या बदलातून जात आहे. ११ प्रमुख वाहन उत्पादकांकडून ट्री बँक, मोबाइल-आधारित ड्रायव्हिंग टेस्ट आणि फ्लेक्स-फ्युएल इंजिनसारखे उपक्रम पाइपलाइनमध्ये आहेत.
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
याशिवाय, २५,००० किमी लांबीच्या दोन पदरी महामार्गांचे चार पदरीमध्ये रूपांतर करणे, प्रमुख मार्गांवर इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सपोर्ट नेटवर्क उभारणे आणि दररोज १०० किमी रस्ते बांधकाम वाढवणे यावर मंत्रालय काम करत आहे. आम्ही नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देत आहोत. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात क्रांती घडत आहे, असे गडकरी म्हणाले.
भारतामधील प्रवासाचा अनुभव बदलण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. याअंतर्गत, केवळ महानगरांवरच नव्हे तर दुर्गम ग्रामीण भागांवरही लक्ष केंद्रित केले जात आहे. आम्ही केदारनाथसह ३६० ठिकाणी रोपवे, केबल कार आणि फनिक्युलर रेल्वे बांधत आहोत. यापैकी ६० प्रकल्पांवर काम सुरू झाले आहे, असे गडकरी म्हणाले.
जगात कधीही तिसरे महायुद्ध भडकू शकते
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी इस्रायल-इराण व रशिया-युक्रेन युद्धांचा संदर्भ देत जागतिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.
महासत्तांच्या हुकूमशाहीमुळे समन्वय, परस्पर सौहार्द आणि प्रेम संपत आहे आणि जगभरात संघर्षाचे वातावरण आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे कधीही तिसऱ्या महायुद्धाचा उद्रेक होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
नागपूरमध्ये असेल पायलट प्रकल्प
इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सपोर्टसाठी नागपूरमध्ये १३५ सीट असलेल्या इलेक्ट्रिक बससाठी निविदा काढण्यात आली आहे.
या बसमध्ये एसीसह विमानाच्या दर्जाच्या सुविधा असतील आणि तिचा वेग १२०-१२५ किमी प्रतितास असेल.