'प्रत्येक नेता निवडणुकीचाच विचार करत असतो, आम्ही साधू-संत नाही'; नितीन गडकरी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 01:29 PM2023-02-06T13:29:07+5:302023-02-06T14:01:19+5:30

'आम्ही निवडणूक जिंकण्यासाठीच आलो आहोत. चांगले काम केले तर जनता पुढच्या वेळेस निवडून देईल.'

Nitin Gadkari News: 'Every leader thinks about elections, we are not saint'; Nitin Gadkari spoke clearly | 'प्रत्येक नेता निवडणुकीचाच विचार करत असतो, आम्ही साधू-संत नाही'; नितीन गडकरी स्पष्टच बोलले

'प्रत्येक नेता निवडणुकीचाच विचार करत असतो, आम्ही साधू-संत नाही'; नितीन गडकरी स्पष्टच बोलले

googlenewsNext


Nitin Gadkari: केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. सार्वजनिक मंचावरही गडकरी आपले म्हणणे अगदी स्पष्टपणे मांडतात. आजतकच्या बजेट कॉन्क्लेव्हमध्येही बोलताना गडकरींनी इलेक्ट्रिक वाहन, एक्स्प्रेस-वेपासून ते बजेटपर्यंत चर्चा केली. सोबतच गडकरींनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीवरही महत्वाची प्रतिक्रिया दिली.

'आम्ही संन्यासी नाही, राजकारणी आहोत'
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मोफत अन्नधान्य, करमाफी आणि इतर दिलासे दिले जात आहेत? या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, 'प्रत्येक नेता निवडणुका डोळ्यासमोर ठेवत असतो, आम्हीही तेच करतोय. आम्ही राजकारणी आहोत, साधू-संत नाही. आम्ही इथे पूजा-पाठ करायला आलो नाहीत. आम्ही निवडणूक जिंकण्यासाठीच आलो आहोत. चांगले काम केले तर पुढे जिंकू. जो चांगले काम करेल, जनता त्यालाच पुढच्या वेळे निवडून देईल. म्हणूनच आम्ही काम करतो आणि निवडून येतो,' असे गडकरी म्हणाले. 

'प्रत्येक राज्यात रस्त्यांची कामे सुरू'
यावर्षी 9 राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. निवडणुका आल्या की प्रकल्प सुरू होतात, असे विरोधकांचे म्हणणे आहे. यावर गडकरी म्हणाले की, 'असे कोणते राज्य आहे जिथे रस्ते बांधले जात नाहीत. सर्व राज्यांमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत. प्रत्येक राज्यात रस्ते बांधले जात आहेत. एकाही राज्याचे नाव सांगा, जिथे रस्ता बांधला जात नाहीय. सर्व राज्यांमध्ये रस्ते बांधले जात आहेत,' अशीही माहिती त्यांनी दिली.

'मी कमिटमेंट नाही, टार्गेट ठरवतो'
यंदाच्या निवडणुकीसाठी काय टार्गेट आहे, या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले की, 'मी निवडणुकीनुसार विचार करत नाही आणि सांगतही नाही. मी काम करत राहतो आणि काम करत राहायलाच हवं. मला माझे टार्गेट सांगण्याचीगरज नाही. 2024 च्या अखेरपर्यंत भारतातील रस्ते आणि पायाभूत सुविधा यूएसएप्रमाणे होतील, हे आमचे टार्गेट आहे. आज वाहनांची संख्या वाढत आहे. प्रत्येक घरात 3 लोक आणि पाच वाहने आहेत. इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहक वळत आहे. येत्या 2 वर्षात पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती समान होतील,' असंही ते म्हणाले.

महामार्ग मंत्रालयाचे व्हिजन काय आहे?
गडकरी म्हणाले की, 'आम्ही ग्रीन एक्सप्रेस हायवे बनवत आहोत. दिल्ली-मुंबई रस्ता तयार होत आहे. 12 तारखेला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दिल्ली ते मुंबई 12 तासांत पोहोचेल. दिल्ली ते जयपूर हे अंतर 2 तासांचे होईल. दिल्ली-डेहराडून 2 तासात जाता येईल. दिल्ली-हरिद्वार 2 तासात, दिल्ली-चंदीगड 2.5 तासात, दिल्ली-श्रीनगर 8 तासात, कटरा 6 तासात, अमृतसर 4 तासात पोहोचेल. चेन्नई ते बंगलोर 2 तासात पोहोचेल. बंगलोर ते म्हैसूर हा एक तासाचा प्रवास असेल. 5 तासात नागपूर ते पुणे पोहोचेल. औरंगाबाद येथून महामार्ग तयार होत आहे, अशीही माहिती गडकरींनी दिली.
 

Web Title: Nitin Gadkari News: 'Every leader thinks about elections, we are not saint'; Nitin Gadkari spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.