फूड स्टॉलवर वाट पाहिली अन् चौघांना मिनिटांत संपवले; पहगाममधल्या दहशतवाद्यांबाबत धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:48 IST2025-04-29T17:45:39+5:302025-04-29T17:48:29+5:30
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी एप्रिलच्या सुरुवातीलाच तिथे आल्याची धक्कादाय माहिती पुढे आली आहे.

फूड स्टॉलवर वाट पाहिली अन् चौघांना मिनिटांत संपवले; पहगाममधल्या दहशतवाद्यांबाबत धक्कादायक माहिती उघड
Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये प्रसिद्ध पर्यटन असलेल्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी गोळीबार करत २६ निष्पाप लोकांची हत्या केली. पर्यटनासाठी आलेल्या १५ राज्यातील या लोकांवर दहशतवाद्यांनी गोळ्या चालवल्या. या हल्ल्यानंतर तपास यंत्रणांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्थेकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं आहे. आता या तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची योजना पाकिस्तानात बसलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या सूत्रधारांनी आखली होती. या दहशतवाद्यांना काश्मीरच्या बैसरन व्हॅली व्हॅलीमध्ये रक्तपात घडवण्यासाठी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आल्याचे एनआयएच्या तपासात उघड झालं आहे.
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात बैसरन व्हॅलीमध्ये प्रवेश केला होता अशी माहिती समोर आली आहे. हे दहशतवादी कोकरनागच्या जंगलातून २०-२२ तास चालत आले होते. दहशतवाद्यांनी एका स्थानिक काश्मिरी आणि एका पर्यटकाचा मोबाईल फोन हिसकावून घेतला होता. या हल्ल्यात चार दहशतवादी सामील होते, ज्यात तीन पाकिस्तानी आणि एक स्थानिक आदिल थोकर हुसेन हा होता. प्राथमिक तपासात हा हल्ला २२ एप्रिलच्या दोन दिवस आधीच होणार होता मात्र हवामान बिघडल्याने तसे झाले नाही.
प्रत्यक्षदर्शींनी एनआयएला सांगितले की, २२ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दोन दहशतवादी फूड स्टॉलच्या मागे बसले होते आणि त्यांनी दुकानात नाश्ता करणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी उभं राहून काही मिनिटांतच चार जणांना ठार मारले. सुरुवातीच्या तपासात संशय होता की दहशतवादी आजूबाजूच्या डोंगरावरून खाली आले आणि त्यांनी लगेच गोळीबार सुरू केला. मात्र आता हल्लेखोर बैसरन व्हॅलीमध्ये फूड स्टॉलवर शांतपणे पर्यटकांची वाट पाहत असल्याचे समोर आलं आहे.
जवळपास ३० मिनिटे चाललेल्या गोळीबारात, दहशतवाद्यांनी लोकांना कलमा म्हणण्यास सांगितले जेणेकरून त्यांचा धर्म ओळखता येईल. यानंतर त्यांनी २६ जणांची निर्घृण हत्या केली. मृतांमध्ये बहुतेक हिंदू पुरुष होते तर एक काश्मिरी मुस्लीम तरुण आणि एक नेपाळी पर्यटक होता. दहशतवाद्यांनी लोकांवर अंधाधुंद गोळीबार न करता त्यांनी एकेकाला लक्ष्य केले आणि त्यांच्या डोक्यात गोळी मारली. हल्ल्यादरम्यान, जेव्हा पहिल्या दोन दहशतवाद्यांनी चार जणांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, तेव्हा गोंधळ उडाला. यानंतर, झिप लाईनजवळून आणखी दोन दहशतवादी आले आणि त्यांनी पळून जाणाऱ्या लोकांवर गोळीबार सुरु केला.
दरम्यान, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच दहशतवाद्यांनी पहलगाममधील हॉटेल्सची रेकी केली होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, २० आणि २१ एप्रिल रोजी झालेल्या पावसामुळे २२ एप्रिल रोजी बैसरन व्हॅलीमध्ये ५,००० हून अधिक पर्यटक होते. दहशतवादी जास्तीत जास्त गर्दीची वाट पाहत होते आणि योग्य संधी मिळताच त्यांनी हल्ला केला का याचाही तपास एनआयए करत आहे.