राजस्थानमधील झालावाड येथे एका भीषण अपघात झाला आहे. हायवेवर एका वाहनाने बाईकला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये एका नवविवाहित जोडप्याचा आणि त्यांच्या भाच्याचा मृत्यू झाला. झालावाडमधील सारथल पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी असलेले धनराज भिल, त्यांची पत्नी खुशबू आणि त्यांचा १३ वर्षीय भाचा सुमित यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.
काही दिवसांपूर्वीच धनराज आणि खुशबू यांचं लग्न झालं होतं. या लग्नामुळे कुटुंबीय आनंदात होते. लग्न झाल्यानंतर मंगळवारी हे जोडपं आपल्या एका भाच्याला घेऊन देवदर्शनासाठी गेले होते. मात्र तिथून घरी परतत असताना हृदयद्रावक घटना घडली. एका वाहनाने रात्रीच्या वेळी बाईकला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे तिघेही रस्त्याच्या कडेला पडले.
खुशबू आणि सुमितचा जागीच मृत्यू झाला, तर धनराज जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात नेल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी शवविच्छेदनानंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवले. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.